सराईत गुन्हेगारांवर कठाेर कारवाई
यापुढेही आणखी प्रस्ताव दाखल करून गुन्हेगारी माेडीत काढू – वाघचाैरे
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, राजुर, घारगाव, आश्वी अशा सहा पोलीस स्टेशन मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी कठोर पावले उचलले आहे. सराईत गुन्हेगारांची यादी करून वारंवार गुन्हे करणार्या अशा तब्बल 33 गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
उपविभागातील सहाही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणार्या गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे. यापूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असणार्या व ज्या गुन्हेगारांनी सन 2022 व 2023 मध्ये पुन्हा गुन्हे केलेले आहेत अशा सर्व गुन्हेगारांची माहिती पोलिसांनी अद्यावत केली आहे. या माहितीची छानणी करून चालू आठवड्यामध्ये त्यातील एकूण 33 व्यक्तींवर दोन वर्ष हद्दपार करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांच्याकडे मागील तीन दिवसात सादर करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, कलम 56, कलम 57 अंतर्गत सदरचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अर्थात गँग तडीपरीचे एकूण चार प्रस्ताव, 19 व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अंतर्गत एकूण 13 प्रस्ताव, 13 व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 57 खाली एक प्रस्ताव, एका व्यक्तीविरुद्ध असे एकूण 33 व्यक्तींविरुद्ध दोन वर्ष हद्दपार करण्यासंबंधीचे प्रस्ताव उपविभागातील पोलीस स्टेशनकडून सादर करण्यात आले आहे. यातील प्रत्येक व्यक्तीविरुद्ध किमान चार किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. प्रस्तावित व्यक्तींचा संपूर्ण गुन्हेगारी अभिलेख एकत्रित करून सदरचे प्रस्ताव बनवण्यात आले आहे.
संगमनेर उपविभागात सर्वाधिक प्रस्ताव संगमनेर शहरातून 19 व्यक्ती विरुद्ध तर संगमनेर तालुक्यातून 8 व्यक्तीविरुद्ध प्रस्ताव सादर केले आहे. पुढील महिन्यात देखील जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलीस स्टेशन स्तरावर सुरू आहे अशी माहिती सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
सदरची कामगिरी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडकर यांनी व त्यांच्या अधिनस्त अन्य अधिकारी यांनी केली आहे.
संगमनेर उपविभागात सहा पोलीस स्टेशनचा समावेश असून या उपविभात गेल्या काही दिवसांपासून काही गुन्हेगार जामिन मिळाल्यानंतरही वारंवार गुन्हे करतात. अशा सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार असे आश्वासन पदभर स्विकारल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिले होते. त्यानुसरा त्यांनी अशा सराईत गुन्हेगारांची यादी करून त्यांच्या गुन्ह्यांची जंत्री जमा केली. तीन पेक्षा अधिक व गंभीर गुन्हे दाखल असणार्या तब्बल 33 जणांवर तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल केला. यापुढेही आणखी प्रस्ताव दाखल करून उपविभागातील गुन्हेगारी मोडीत काढू असे वाघचौरे यांनी सांगितले.