लोखंडे – वाकचौरे एकाच माळेचे मणी – कोण होणार लोकसभेचे धनी, कोण चाखणार पराभवाचे पाणी ?

0
1269

लोकसभा निवडणूक लोकशाहीचा उत्सव असला तरी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील लोकप्रतिनिधींची योग्य निवड मतदानाद्वारे करण्याची महत्वाची जबाबदारी आहे. पंधरा वर्षांपूर्वी शिर्डी (पूर्वीचा) कोपरगाव लोकसभा मतदारसंघ राखीव झाला आणि अनेकांना खासदारकीचे डोहाळे लागले. 2014 मध्ये शासकीय अधिकारी असलेले भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीतून शिवसेनेचे खासदार झाले. खरे तर शिर्डी हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. परंतु आरक्षणामुळे आणि एकमेकातील भांडणामुळे काळे – कोल्हे, थोरात – विखे, पिचड यांचा प्रभाव असलेल्या मतदार संघातून 2009, 2014 व 2019 या तीनही निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार खासदार झाला. भाऊसाहेब वाकचौरेंच्या पक्षीय कोलांट्या उड्यामुळे सदाशिव लोखंडे दोन वेळा शिवसेनेचे खासदार झाले. सत्तेच्या साठमारीत शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांच्या चिंधड्या झाल्या. काँग्रेसचे अनेक मोहरे भाजपवासी झाले आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवनेनेचेच दोन उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे निवडणुक लढवीत आहेत. उबाठाचे वाकचौरे व शिंदे सेनेचे लोखंडे दोघेही शिवसेनेचे असले तरी त्यांच्या पालख्या काँग्रेस राष्ट्रवादी वाहत आहे. हा काळाचा महिमा आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील एक पंचवार्षिक भाऊसाहेब वाकचौरेंनी अनुभवल्यानंतर दोन पंचवार्षिक सदाशिव लोखंडेंनी अनुभवल्या आहेत. प्रशासकीय कामाचा व प्रशासनाचा चांगला अनुभव असतानाही भाऊसाहेब वाकचौरे मंदिराच्या सभा मंडपात अडकून पडले. लग्न सोहळे व दशक्रिया त्यांच्या सोईने करीत राहिले मात्र त्यांच्या कर्तृत्वाची आठवण म्हणून कोणतेही काम त्यांना मतदार संघात उभे करता आलेले नाही. निसर्ग सौदर्याची खाण असलेला अकोले तालुका आणि सतत उपेक्षित असलेला आदिवासी माणूस त्यांच्यासाठी फार काही करू शकले नाहीत. 2014 ला सत्तालोभासाठी पक्ष बदलून ते लोकसभा लढले मात्र शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी झाले. काँग्रेसवाल्यांनी फसवले. अशी कितीही ओरड वाकचौरेंनी केली तरी जनता सुज्ञ असल्याने मतदानाद्वारे वाकचौरेंना नाकारले.


दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने लोखंडे शिर्डीचे खासदार झाले. मात्र ते सुद्धा ठराविक व्यक्तींच्या गराड्यातच दहा वर्षे राहिले. वाकचौरेंनी केलेले मंदिराचे सभामंडप काही ठिकाणी दिसतात तरी. लोखंडेंकडे दहा वर्षात दाखविण्यासाठी आणि आठवण्यासाठी एकही ठोस काम नाही. निळवंडे धरण आणि पाटण्याचे ते सांगत असले तरी खरी तपश्चर्या राहाता कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील वंचित शेतकर्‍यांची ती लढाई आहे. पश्चिमेचे पाणी पूर्वेस आणू असे गाजर दाखवून ते निवडणूक लढत आहेत. मात्र मतदार वाकचौरे आणि लोखंडे दोघांनाही वैतागलेले आहेत. हे मतदार संघाचा कानोसा घेतला की जाणवते.
खासदारकीपासून वंचित असलेल्या रुपवते परिवारातील उत्कर्षा रुपवतेच्या ऐंट्रीने वाकचौरे लोखंडेंची हवा टाईट झाली आहे. उत्कर्षाचे वडील व मंत्री असलेल्या दादासाहेब रुपवतेचे चिरंजीव व मधुकरराव चौधरींचे जावई प्रेमानंद रुपवते यांनी दोन वेळा खासदारकीत यश मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र यश मिळाले नाही. राजकीय वारसा असलेल्या उत्कर्षा रूपवतेंनी शिर्डीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी फार प्रयत्न केले. विविध पक्षातील आघाड्यातील बिघाडयामुळे उत्कर्षाला काँग्रेसची उमेदवारी बाळासाहेब थोरात देऊ शकले नाहीत. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी करीत असताना वंचितकडून उमेदवारी उत्कर्षा रूपवतेंला मिळाली. आणि विजयाचे गुलाबजाम झोपेत खाण्यार्‍या लोखंडे वाकचौरेंना खाडकन जाग आली. शिर्डीसाठी उमेदवारी करणारी उत्कर्षा निवडून येईल की नाही हे मतदार व काळ ठरवविल, मात्र वाकचौरे – लोखंडे पैकी जो पडेल त्यास उत्कर्षाची उपद्रव क्षमता नक्की समजेल. विजयासाठी लाखांच्या मताधिक्याच्या बाता मारणार्‍या वाकचौरेंना भ्रमात राहू नका असे श्रेष्टीना जाहीर सांगावे लागले.


लोकसभा निवडणूक म्हणजे देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक असते. राष्ट्राच्या प्रगतीच्या दिशा, नैसर्गिक व राजकीय प्रश्नावरील उपाय, लोकसंख्या, पर्यावरण, हवामान याविषयी ठोस निर्णय करून प्रगती करण्यासाठी निर्णायक बहुमताची गरज असते. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार चारसो पार घोषणा केली मात्र झालेले मतदान देशातील वास्तविकता वेगळेच संकेत देत आहे. असे असले तरी देश प्रगतीसाठी जमीन, पाणी, आकाश या स्रोताद्वारे प्रगती करण्यासाठी जनतेची मोठी साथ असली तरच शक्य होते. शिर्डी लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर लोखंडे महायुतीचे उमेदवार म्हणून मागील पाच वर्षात जनतेपासून म्हणजे मतदारापासून दूर राहिले. वाकचौरे सत्तेसाठी पक्षबदल करीत राहिले आणि उत्कर्षा यांचा नवा चेहरा म्हणून मतदारांसमोर आहे. चार जूनला जाहीर होईल की शिर्डी मतदारसंघाचा खासदार कोण आहे. जो कोणी असेल त्याने पुढील काळात बदलून घेतले पाहिजे व ठोस कामे केली तरच त्यांचा फायदा संबंधीत पक्षाला होईल. लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रणरणत्या भर उन्हात प्रचारासाठी फिरत आहे जनता (मतदार) मात्र सतत प्रतिकूलतेच्या उन्हात भाजत असतात यांची जाणीव विजयी उमेदवाराने ठेवावी. घोडा मैदान जवळ आहे. वाकचौरे, लोखंडे, एकाच माळेचे मणी असले तरी, उत्कर्षा नवा चेहरा असला तरी विजयी होणार्‍या उमेदवारांचे स्वागतास नाराज असले तरी मतदार तयार असतात. मतदाराच्या या भावनेचा विचार करून पुढील पाच वर्षात भरीव टिकावू काम करावे एवढीच अपेक्षा…

  • किसन भाऊ हासे
    संगमनेर
    मोबा. – 9822039460

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here