घाईत निर्णय घेऊ नका
गेल्या काही वर्षात बँका व इतर वित्तीय आस्थापनांमध्ये फसवणूकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आर्थिक गैरव्यवहार ( फॉरेन्सिक फ्रॉड ) थांबवण्याचे काम फॉरेन्सिक अकौंटंट ( न्यायवैद्यक लेखापरीक्षण ) करतात. तंत्रज्ञान व लेखापरीक्षणाचा आधार घेऊन अशा प्रकारच्या फसवणूकीचे प्रकार उघड करताना न्यायालयासमोर पुरावे सादर करण्याचे काम या क्षेत्रातील तज्ज्ञ करीत असल्याचे प्रतिपादन डॉ. अपूर्वा जोशी यांनी केले. कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने कवी अनंत फंदी व्याख्यानमालेतील सहावे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. मुलाखतवजा प्रश्नोत्तराच्या फॉर्ममध्ये व्याख्यानमालेच्या प्रकल्प संचालक स्मीता गुणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, प्रकल्प संचालक अॅड. ज्योती मालपाणी आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुधाकर जोशी म्हणाले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आर्थिक समृध्दी नांदत असून विविध पतसंस्थांचे मोठे जाळे उभे राहिले आहे. चांगल्या कारभाराचा आदर्श असलेल्या सहकारी संस्थांमुळे बाजारपेठ समृध्द झाली आहे. तालुक्यातील नागरिक आर्थिक क्षेत्राकडे डोळसपणे बघत असला तरी, भविष्यात वाढणाऱ्या सायबर क्राईमबाबत सजग असणे व आर्थिक साक्षरता महत्वाची आहे.
डॉ. जोशी यांनी वयाच्या अठराव्या वर्षी जानेवारी २००८ साली या क्षेत्रातील कामाची सुरुवात केली. इन्व्हेंटरी फ्रॉड शोधण्याचे पहिले आव्हानात्मक काम बेंगलोर येथील वेअर हाऊसचे मिळाले. मोठी घाऊक विक्री करण्याच्या नावाखाली खोटे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करण्याचा प्रकार त्यांच्या पथकाने उघडकीला आणला. यातून मिळालेली माहिती प्रमाण न मानता, त्यातील सत्य शोधण्याचा पहिला धडा त्यांना मिळाला. तरुण वयातच फॉरेन्सिक अकौंटन्सी या आव्हानात्मक क्षेत्रात करीअर करताना १५ वर्षात या क्षेत्रातील दोन डॉक्टरेट मिळवलेल्या अपूर्वा जोशी यांनी सोप्या शब्दात आर्थिक गुन्ह्यांमागील कारणे व कार्यपध्दती उलगडताना त्या शोधण्यासाठी कराव्या लागणाऱ्या दिव्याची माहिती दिली. आर्थिक गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने तसेच यात संबंधित विषयातील व प्रत्यक्ष या क्षेत्रात कार्य करणारे गुंतले असल्याने अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या प्रकरणाचा कसोशिने तपास करुन त्या सबळ पुराव्यानिशी न्यायालयासमोर सादर करण्याचे काम फॉरेन्सिक अकौंटंट करतात. देश विदेशातील बँकींगसह छोट्या मोठ्या उद्योगातही हे प्रकार वाढल्याने या क्षेत्रातील कामे वाढली आहेत. बँका व परदेशी कंपन्यांसाठी अशा प्रकारची कामे स्थानिक पातळीवरील तज्ज्ञांकरवी केली जातात. सध्या विमा कंपन्यांसह सुमारे १० हजार लिस्टेड कंपन्यांमध्ये आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी ( ड्यू डीलीजन्स ) घोटाळे नियंत्रण पथक ( फ्रॉड कंट्रोल युनिट ) अंतर्गत फॉरेन्सिक अकौंटंटची नियुक्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र देशात अशा तज्ज्ञांची कमतरता असल्याने या क्षेत्रात करीअर करण्यास मोठा वाव आहे. आर्थिक घोटाळ्याचे पैसे नेमके कुठे गेले, त्याचा उपयोग कशासाठी झाला हे शोधण्याचे काम अवघड असते. अनेक कंपन्यांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्याची माहिती असूनही नोकरीवर गदा येण्याच्या भितीमुळे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे कंपनीचे नुकसान होत असल्याने अशा प्रकाराची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते या व्हीसल ब्लोईंग तंत्रज्ञानाने संभाव्य हानी टाळता येते. या ग्लोबल क्षेत्रात करीअर करण्यासाठी ऑडिट व अकौंटन्सीचा पाया असावा लागतो. तसेच कायद्याची पदवी व गुन्हेगारीच्या मानसशास्त्राचा अभ्यास असल्यास मोठा फायदा होतो. यात तंत्रज्ञान हा महत्वाचा भाग समाविष्ट झाल्याने, कॉम्प्यूटर फॉरेन्सिक क्षेत्रातही करीअर होऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील घोटाळ्यांबाबत ” अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कार्पोरेट फ्रॉडस् ” या अंतर्गत केलेल्या संशोधनात देशातील विविध बँका व कंपन्यांसह १४ क्षेत्रात होणारे घोटाळे शोधण्यात यश आले. याची दखल मोठ्या वृत्तपत्रांनी घेतली.
कोविडनंतर कॅशलेस व्यवहारात वाढ झाली असून, ऑनलाईन पेमेंट करण्याकडे कल वाढला आहे. बदलत्या काळात या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अनिवार्य असले तरी यात स्मीशींग, फीशिंग यातून फसवणूक होते. बँकेच्या नावाने फसवे मेल अथवा मेसेज पाठवून ओटीपी व वैयक्तिक माहिती मागितली जाते. अनेकदा या मायाजालात फसून आपण ही माहिती देतो. त्यातून आपल्या खात्यावरील रक्कम लांबवण्यात येते. त्यामुळे या प्रलोभनाला न भुलता, आर्थिक निर्णय घेताना वेळ घेण्याची आवश्यकता असते. तसेच लोन अॅप स्कॅमच्या अॅपमधून तात्कळ ऑनलाईन कर्ज देऊ करतात. याबाबत घाईने निर्णय घेतल्यास अवाजवी व्याजासह आठवड्याच्या हप्त्याची परतफेड गळ्यात पडण्याची शक्यता असते. केवायसी न घेता कर्ज देणारे अॅप मोबाईलची फोटो गॅलरी व कॉन्टॅक्ट नंबरचा अॅक्सेस मागतात. कर्ज फेडण्यास उशिर झाल्यास आपल्या गॅलरीतील फोटो मॉर्फ करुन नातेवाईकांना पाठवून सामाजिक बदनामी केली जाते या प्रकारातून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच बँकेतून कर्ज घेतानाही ” अंथरुण पाहून पाय पसरावेत ” ही बाब लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. क्रेडीट कार्डावरच्या कर्जाचे व्याजही अनेकदा अवाजवी असते. बँका किंवा पतसंस्थेत ठेवी ठेवताना संबंधित बँकेवर यापूर्वी झालेली कारवाई, लेखापरीक्षकाचा राजिनामा, प्रशासकाची नियुक्ती, संचालक मंडळाचे अचानक बदलणारे निर्णय या बाबींची माहिती घेतल्यास किंवा मोठ्या ठेवीदारांशी चर्चा केल्यास अधिक माहिती मिळते. निरव मोदी, विजय मल्ल्या या सारख्या मोठ्या कर्जदारांच्या घोटाळ्यांची सविस्तर माहिती दिली. घोटाळे शोधण्याचे काम करताना, बदल करण्यासाठी संबंधीत पार्टीने देऊ केलेल्या पैशाच्या मोहात न पडता तत्व जपणे महत्वाचे असते, तसेच अशा वेळी आपल्या सहाव्या इंद्रीयाने दिलेला संदेश मानणे गरजेचे असल्याचे शिकता आले. आपल्या बँक खात्याचा जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून गैरवापर होण्याची शक्यता असल्याने क्वीक मनीच्या फंदात पडू नये. व्यवहार करताना डोळे उघडे ठेवावेत कारण अनेक छोट्या गोष्टी नंतर मोठे रुप धारण करतात असा सल्लाही त्यांनी दिला.