
विद्यमान पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून नारळ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून या नविन नियुक्त्या जाहीर झाल्या असून यात जिल्हा प्रमुखपदी पुन्हा रावसाहेब खेवरे (शिर्डी लोकसभा) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर संगमनेर शिवसेना शहर प्रमुखपदी पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते असलेले अप्पा केसेकर तर उपजिल्हा प्रमुखपदी अशोक सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान या नविन नियुक्त्यांमध्ये शिवसेनेच्या विद्यमान सर्वच पदाधिकार्यांना पक्षाने नारळ दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना (ठाकरे गट) काही दिवसांपासून पदाधिकार्यांची खांदेपालट सुरू आहे. यात प्रामुख्याने शिर्डी लोकसभेच्या जिल्हाप्रमुखपदी रावसाहेब खेवरे यांची वर्णी लागली आहे. तर ज्येष्ठ शिवसैनिक कैलास उर्फ अप्पा केसेकर यांची संगमनेर शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाने संगमनेरसह अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा या उत्तरेतील सर्व तालुक्यात खांदेपालट केली आहे.
नवीन पदाधिकारी पुढील प्रमाणे – जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, प्रचारप्रमुख सुहास वहाडणे (संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी), सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), अॅड. दिलीप साळगट (संगमनेर, अकोले, राहाता), जिल्हा समन्वयक नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता), जिल्हा संघटक नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा) आदींची निवड करण्यात आली आहे.
संगमनेर शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आले असून विद्यमान पदाधिकार्यांना नारळ देत उपजिल्हा प्रमुखपदी अशोक सातपुते यांना बढती देण्यात आली आहे. यात तालुकाप्रमुख (पठारभाग) संजय फड, विधानसभा संघटक (पठार) गुलाबराजे भोसले, कैलास वाकचौरे, शहर संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, शहर समन्वयक प्रसाद पवार यांची वर्णी लागली आहे.
पक्षाचा निर्णय धक्कादायक – कतारी
शिवसेना शहरप्रमुख म्हणून पक्षाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करत पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. तरूणांचे संघटन करून विविध विषयांवर सातत्याने आंदोलन केले. पक्षाने अनेकवेळा शाबासकीची थाप दिली. मात्र आज अचानक पदाधिकारी नियुक्ती जाहिर करत माझ्यासह अनेकांना पदमुक्त केले हे आपल्यासाठी व कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. मात्र पक्षाचा निर्णय अंतिम मानत यापुढेही देखील पक्षकार्यासाठी कार्यरत राहू असे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे.