
व्यवसाय आणि करदात्यांसाठी मार्च एंड का महत्त्वाचा?
दरवर्षी मार्च महिना आला की “मार्च एंड” हा शब्द सर्वत्र ऐकू येतो. व्यावसायिक, उद्योजक, बँकर्स, कर सल्लागार, लेखापाल आणि सरकारी अधिकारी यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र अनेकांना मार्च एंड म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व काय आहे, हे स्पष्ट समजत नाही. हा लेख वाचून तुम्हाला मार्च एंडच्या आर्थिक आणि कायदेशीर पैलूंविषयी स्पष्ट माहिती मिळेल.
मार्च एंड म्हणजे काय?
भारतातील आर्थिक वर्ष (Financial Year) १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत असते. त्यामुळे ३१ मार्च हा त्या आर्थिक वर्षाचा अंतिम दिवस असतो. हाच दिवस “मार्च एंड” म्हणून ओळखला जातो. हे वर्ष व्यवसाय, कर, वित्त, बँकिंग आणि सरकारी यंत्रणांसाठी महत्त्वाचे असते, कारण आर्थिक वर्षाच्या समाप्तीपूर्वी अनेक वित्तीय आणि कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात.

मार्च एंडचे महत्त्व
१) व्यवसाय आणि करदात्यांसाठी (Individuals & Businesses)- मार्च एंड म्हणजे फक्त महिन्याचा शेवट नसून वर्षभरातील आर्थिक व्यवहारांचे संकलन आणि त्यावर योग्य नियोजन करण्याचा काळ आहे.
लेखापरीक्षण (Audit):- कंपन्या, फर्म्स आणि व्यवसायांना Balance Sheet, Profit & Loss Account आणि Income Tax Computation अंतिम करावे लागते.
ऑडिटर (Auditor) कंपनीचा आर्थिक व्यवहार तपासतात आणि आर्थिक आरोग्य स्पष्ट करतात.
कर नियोजन:- व्यवसाय आणि व्यक्तींनी त्यांचा आयकर (Income Tax), GST आणि TDS हिशेब पूर्ण करून ३१ मार्चपूर्वी आवश्यक कर भरणा करावा. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी टॅक्स सेव्हिंगसाठी (Tax Planning) योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
कर्ज परतफेड आणि गुंतवणूक निर्णय:- व्यवसायांना त्यांच्या Cash Flow Management आणि कर्ज व्यवस्थापनासाठी मार्च एंडपूर्वी सर्व तोडगे काढावे लागतात. अनेक कंपन्या थकबाकी वसुली (Receivables Collection) मार्च एंडपूर्वी पूर्ण करण्यावर भर देतात.
२) बँका आणि वित्तीय संस्थांसाठी मार्च एंडचे महत्त्व
बँकांचे आर्थिक वर्ष समारोप:- पतसंस्था, राष्ट्रीय आणि सहकारी बँका मार्च एंडपर्यंत लाभ-तोटा पत्रक, बॅलन्स शीट आणि NPA (Non-Performing Assets) चा आढावा घेतात. नवीन वर्षात बँकेच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल करण्यासाठी मार्च एंडपूर्वी सर्व आर्थिक ताळमेळ (Financial Adjustments) करून ठेवले जातात.
NPA व्यवस्थापन:- बँकांसाठी थकीत कर्जे (Bad Loans) आणि NPA ची रक्कम कमी ठेवणे महत्त्वाचे असते.मार्च एंडपूर्वी कर्ज वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जाते.
कर्ज मंजुरी आणि पुनर्गठन:- MSME आणि इतर लघु-मध्यम उद्योगांना बँका मार्च एंडच्या आधीच नवीन कर्जे मंजूर करतात.काही वेळेस कंपन्या कर्जाची पुनर्रचना (Loan Restructuring) करून आर्थिक बोजा हलका करण्याचा प्रयत्न करतात.
३) MSME उद्योगांसाठी मार्च एंडचे महत्त्व
उद्योगांसाठी कर व वित्तीय नियोजन:- MSME उद्योगांनी Udyam Registration अपडेट ठेवणे आवश्यक आहे.सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध योजना, सबसिडी आणि अनुदान मार्च एंडपूर्वी क्लेम करणे गरजेचे असते.
GST आणि TDS वेळेवर भरला पाहिजे:- Small & Medium Enterprises (SME) साठी GST भरणा, TDS भरणा आणि ROC Compliance पूर्ण करणे आवश्यक आहे.
बँक आणि पतसंस्थांकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ:- मार्च एंडपूर्वी बँका आणि पतसंस्था उद्योगांना विविध व्याज दर सवलती, कर्ज पुनर्रचना आणि सबसिडी योजनांचे फायदे देतात.
४) सरकारी योजना, सबसिडी आणि अनुदानासाठी मार्च एंड महत्त्वाचा का?
सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदान आणि योजनांची अंतिम मुदत:- राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध सबसिडी योजना आणि वित्तीय अनुदानांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च असते.उदाहरणार्थ, PMEGP, Mudra Loan, MSME Subsidy अशा योजनांचे फायदे मार्च एंडपूर्वी क्लेम करणे गरजेचे असते.
बजेट आणि निधी वाटप:- सरकार विविध योजनेअंतर्गत दिलेला निधी मार्च एंडपूर्वी वितरित करते.
५) कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक नियोजन
कर बचतीसाठी गुंतवणूक:- कर्मचारी आणि व्यावसायिकांनी PPF, LIC, ELSS, EPF, NPS यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून कर बचत करावी.
बोनस आणि पगार समायोजन:- अनेक कंपन्या मार्च एंडपूर्वी बोनस, इन्क्रीमेंट आणि प्रमोशन संबंधित निर्णय घेतात.
मार्च एंडची योग्य तयारी कशी करावी?
-आयकर नियोजन: आर्थिक वर्ष सुरू होताच कर सल्लागाराकडून सल्ला घ्या.
-ऑडिट आणि हिशेब वेळेत पूर्ण करा.
-GST आणि TDS वेळेवर भरा.
-कंपनीचे आर्थिक आरोग्य तपासा आणि पुढील आर्थिक वर्षाची योजना आखा.
निष्कर्ष
“मार्च एंड” म्हणजे फक्त महिन्याचा शेवट नव्हे, तर संपूर्ण आर्थिक वर्षाच्या नियोजनाचा अंतिम टप्पा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक, उद्योजक, बँकर, MSME उद्योजक आणि कर्मचारी वर्गाने योग्य वेळी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
सागर हासे,
कर सल्लागार
संचालक – SLH Tax
Advisors Pvt Ltd,
संगमनेर