वादग्रस्त दिल्ली नाका येथे तीन तरुणांना बेदम मारहाण

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणार्‍या व बदनाम झालेल्या दिल्ली नाका परिसरात शनिवारी रात्री पुन्हा एकदा ग्रामीण भागातील काही तरुणांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर पसरवून आपल्या धर्माच्या तरुणांना दुसर्‍या धर्माच्या तरुणांनी मारहाण केल्याचा संदेश पसरल्याने पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली. संतप्त झालेल्या तरुणांनी व संघटनांनी शहर पोलिस ठाणे गाठून जाब विचारत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. येथील लोकप्रतिनिधींनी देखील शहर पोलिस ठाणे गाठून कारवाईच्या सूचना दिल्या. दरम्यान या घटनेनंतर ही मारहाण होण्याच्या अगोदरच्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले. ज्यांना मारहाण करण्यात आली त्यांनीच या वादाला सुरुवात केल्याचे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या वादाला धार्मिक वादाचे स्वरूप देऊन शहर अशांत ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना मोठी चपराक बसली आहे.


दरम्यान याबाबत विकास दीपक गायकवाड (वय 26 वर्ष, रा. निळवंडे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, मोबाईलला स्क्रीन गार्ड टाकण्यासाठी मित्र निखिल बिडवे आणि विकास आहेर असे तिघेजण संगमनेर शहरात आले होते. काम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नाटकी नाला, दिल्ली नाका जवळ, संगमनेर लोणी रस्त्यावरील लकी पान स्टॉल येथे पान घेण्यासाठी थांबले. दुकानात जाऊन एक साधा पान देण्यास सांगितले. परंतु दुकानदाराने म्हणणे ऐकले नसल्यामुळे विकास याने पुन्हा त्यास एक साधा पान द्या, असे सांगितले असता, तो म्हणाला की, आवाज नीचे करके बात करने का। और आख नीचे करके बात कर। हमे पता है तुम्हारा आमदार आया है। पर उसका हम पर कुछ फरक नही पडेगा असे म्हणून तो दुकानाच्या बाहेर आला व त्याच्या हातामध्ये एक तलवार होती त्याने ती विकासच्या डोक्यात मारली त्यावेळी तलवारीची मूठ लागल्यामुळे विकास खाली पडला. त्याच वेळी इतर पंधरा ते वीस अनोळखी लोक आले व त्यांनी विकास आणि बाकीच्या दोन मित्रांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यातील दुकानदाराने मोठ्याने आवाज दिला, इसमे से दो लोगों को काट डालेंगे। इसका सब पे असर पडेगा। असे म्हणत त्या 15 ते 20 लोकांच्या जमावाने पुन्हा तिघांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि तेथून निघून गेले. यावेळी विकासच्या हातातील 40 हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची अंगठी, आठ हजार रुपये, निखील बिडवे यांच्या हातातील 6000 रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची व चांदीची अंगठी, तसेच नऊ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल मारहाण करणार्‍यांनी काढून घेतला. त्यामुळे अज्ञात 15 ते 20 लोकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण झालेल्या तरूणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आ. अमोल खताळ यांनी शांततेचे आवाहन करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यापुढे शहरातील अशा प्रकारची गुंडागर्दी खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. तर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची विचारपूस केली. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान अशी फिर्याद जरी दिली असली तरी मुळ घटनेचा व्हिडिओ मात्र वेगळेच सांगत असल्याचे समोर आले आहे. काही तरुण नशाखोरी करून किंवा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन करतांना आढळून येतात. वैयक्तिक वादातून किंवा दहशत पसरविण्यासाठी काही जण वाद निर्माण करतात. मात्र आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कुणीही खात्री न करता एकाच बाजूने विचार करून अशा वैयक्तिक वादाला धार्मिक स्वरूप देऊन संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे काम केले जाते. एकेकाळी दंगलीचे शहर म्हणून ओळखले जाणारे संगमनेर शहर आता प्रगतीच्या दिशेने जात असताना गेल्या काही दिवसांपासून अशा अपप्रवृत्ती दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसतात. पोलिस प्रशासनाने अशा घटनांना सखोल तपास करून जातीय, धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम करणार्‍यांना कायमस्वरूपी धडा बसेल अशी अद्दल घडविली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत आहेत आणि त्या परिसरात दहशत पसरवीत गुंडागर्दी करणार्‍यांची त्याच ठिकाणी जाहीर धिंड काढली तर अशा घटनांना आळा बसेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख