साहेब विकासाचे नंतर बघू…पहिले पाण्याचे बघा
संगमनेर (प्रतिनिधी)
साहेब रस्ते, सभामंडप, विकासाचे आश्वासन नंतर द्या, पण पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा असे खडे बोल संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील गावोगावच्या दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांनी प्रचार करण्यासाठी गावात आलेल्या उमेदवारांना सुनावत आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाईची दाहकता किती आहे, याचे वास्तव चित्र या निवडणूकीनिमीत्ताने पाहावयास मिळत आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 13 तारखेला मतदान होणार आहे. सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसत असून पाणी टंचाईने नागरिक हैराण झाले आहे. त्यातच ऐन उन्हात प्रचारही शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांचे मुले व कार्यकर्ते पठारभागातील गावांसह- वाड्यावस्त्यांवर जाऊन जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारात उमेदवार व कार्यकर्ते आम्हालाच मतदान करा अशी हात जोडून विनंती करत आहे. मात्र नागरीकांना सध्या मतापेक्षा पाणी महत्त्वाचे वाटत आहे. मते मागण्यासाठी येणार्या उमेदवारांना साहेब रस्ते, विकास, सभामंडप आणि इतर आश्वासने नंतर द्या, पण पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा असे मतदार म्हणत आहे. पाणी देणार्या उमेदवारालाच एकप्रकारे पसंती त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच डोकेदुखी वाढत आहे. सध्या तालुक्याला भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून गावोगावी व वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर मोठ्याप्रमाणात सुरू आहेत.
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत चालली आहे. तशा पाणीटंचाईच्याही झळा मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. वर्षानुवर्षांपासून उन्हाळ्यात पठारभागावरील अनेक गावांसह वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक महिलांसह-पुरुष मंडळीही कोसो मैल दूर जाऊन पाणी आणत असतात तेव्हा कुठेतरी पाणी मिळत आहे. हे चित्र वर्षांनुवर्षांपासून पठारभागात पाहावयास मिळत आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याच खासदार व आमदाराने पठारभागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही.