गेल्या आठवड्यात एका वर्गमित्राचा फोन आला होता. त्याच्या पुतण्याने कुठलशा उपयोजनावरून आभासी चलनात गुंतवणूक केली होती. परंतु आता त्याची गुंतवणूक रक्कम शून्य झाली आहे आणि वरून भारी रकमेचे कर्जही करून ठेवले आहे, तो सांगत होता. नेमकं काय झालं असेल? तू माहिती घेऊन सांगू शकशील का? मला आर्जव करत होता. त्याने सांगितलेल्या उपयोजनाचं नाव ऐकल्यावर लक्षात आलं कि, गडी झटपट श्रीमंत होण्याच्या मागावर होता. १३ जूनच्या लेखात लिहिल्याप्रमाणे “App” ली मानसिकता ओळखून अशा जाहिरातींच्या मोहजालात सावज टिपण्यात मायाजाल यशस्वी होत आहे. अशी उदाहरणं तुमच्याही आजूबाजूला भरपूर असतील. पण त्याच चूका वारंवार कशामुळे घडत असतील?
पंचविशीतल्या आत बाहेरच्या वयोगटाच्या दोन बाजू आहेत. एका गटाला मिळत असलेल्या सो कॉल्ड गलेलठ्ठ पॅकेजेसमुळे “अर्थनिर्भर” झाल्याची भावना वाढीस लागली आहे. तर दुसरा गट आर्थिक विवंचनेत आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणातून मिळविलेली पदवी काम करत नाही. कौशल्य विकासासठी अधिकचा अभ्यासक्रम शिकावयाचा ठरल्यास उत्साह राहत नाही. कदाचित आपल्या सोबतचे पुढे निघून गेल्याचं सल नैराश्य आणत असेल. त्यातच बहुतांश घरातून होणारी उपहासात्मक टीका निर्णय न घेण्यास अजूनच खतपाणी देत असते. मग यावर उपाय काय? तर अशी तरुणाई झटपट पैसे कमवून काहीतरी अचाट करण्याच्या नादात “अ(न)र्थसाक्षरतेचे” बळी ठरत असतात.
यांत तिळमात्र शंका नाही कि महागाई तुमच्या पैशाचं मूल्य कमी करत असते. परंतु अर्थतंत्रस्नेही (Fintech) उपयोजन तयार करणाऱ्या कंपन्यांनी भितीचा असा काही बागुलबुवा उभा केला आहे कि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तुम्हाला त्याच त्या जाहिराती दिसतील याची व्यवस्था करून ठेवली आहे. त्यातली एक जाहिरात झळकते, हा रोनक. वयाच्या २२व्या वर्षी तो कोट्याधीश झाला कारण तो आपल्या पगाराच्या ५०% गुंतवणूक दरमहा कूटचलनात करत होता. आणि मग बघणारा भाळतो कारण शेवटी त्यांनी “तुम्ही मागे तर नाही राहिलात ना?” अशी भितीदायक ओळ बोलून तुम्हाला निर्णय घेण्यास उद्युक्त केलेले असते. आज नाही तर कधीच नाही अशी अवस्था निर्माण झाल्याचा भास होऊन मग चुकीचा निर्णय घेतला जातो आणि मग सुरु होतो चक्रव्यूह.
गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे “कुठलेही गुंतवणूक साधन हे महागाईवर मात करू शकेल” अशी खात्री देऊ शकत नाही. जर काही हजार रुपये गुंतवून काहीशा कोटीचे धनी होणार असू तर शिक्षणाची आणि परिणामी नोकरी-व्यवसाय करण्याची गरजच उरणार नाही. काय वाटतं तुम्हाला? बरं समजा असा फायदा झाला देखील तर त्याचं नियोजन तयार आहे का? अशा वृत्तीला FOMO (Fear Of Missing Out) म्हणतात. अशा वृत्तीची लोकं आहे ते सुद्धा आपल्या कृतीमुळे गमावून बसतात. त्यामुळे मालमत्ता विभाजन हाच महागाईवर मात करण्याचा उपाय आहे. पण इथे प्रत्येकालाच झटपट श्रीमंत व्हायचे आहे. आणि मग अशांसाठीच वेगवेगळे सापळे बनविले जातात आणि सावज गळाला लावला जातो.
नुकतेच कमवू लागलेले तरुण काय करतात?
१) जास्तीत जास्त वेळ युट्यूबवर बाजार कुठल्या दिशेला जाईल याचे अंदाज सांगणाऱ्या तज्ञांचे व्हिडीओज बघण्यात वेळ घालवतात. तुमच्या नोकरीला किंवा व्यवसायाला अजिबात स्पर्धा नसेल तर असे करायला हरकत नाही. परंतु हातात असलेल्या मिळकतीची शाश्वती नसेल तर त्यातले कौशल्य वाढविण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वोत्तम बनलात तर तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळू शकतात.
२) जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा (कदाचित) तुमचे उत्पन्न कमी असू शकते पण वेळ मुबलक असतो. उत्पन्न कमी आहे म्हणून ५०% पेक्षा जास्त गुंतवणूक करून करोडपती बनण्यासाठी हौशेला मुरड घालणे हा शुद्ध मूर्खपणा ठरू शकतो. तुम्ही पहिल्या पगारापासून किमान ३०% रक्कम गुंतविली तरीसुद्धा योग्य वयात व योग्य वेळी करोडपती बनून श्रीमंतीचा उपभोग घेऊ शकता. फक्त नियोजन आणि शिस्त यांचा मेळ घालता आला पाहिजे.
“पुष्पा” चित्रपटात ३ प्रमुख पात्र आहेत. पुष्पराज, त्याचे शत्रू आणि एक पोलीस अधिकारी. पुष्पराज आणि त्याचे शत्रू एकमेकांना प्रत्यक्ष शह काटशह देण्याचा प्रयत्न करत असतात. तर पोलीस अधिकारी त्यांच्यावर बंदूकीने नाही तर मनाने दहशत निर्माण करत असतो. चित्रपटाचे कथानक आणि त्यातून समाजाला जाणारा संदेश सकारात्मक कि नकारात्मक हा मुद्दा गौण ठरवून प्रेक्षकांनी “पुष्पा”ला डोक्यावर घेतले. त्यातलं तेरी झलक अशरफी हे गाणं खूपच गाजलं. “अशरफी” हा फारसी शब्द आहे. तेव्हाच्या राजांनी मुद्रित केलेल्या सोन्याच्या किंवा चांदीच्या शिक्क्यांना “अशरफी” म्हटले जात असे. त्याचा दुसरा अर्थ “महान” असा सुद्धा होतो.
पैसा हा नेहमीच महान असतो. तो असला किंवा नसला तर काय काय करू शकतो? हे सर्वांनाच चांगले ज्ञात आहे. चित्रपटातले ३ पात्रं तुमच्या आर्थिक आयुष्यात देखील आहेत. पुष्पा म्हणजे महागाई, शत्रू म्हणजे विविध उपयोजनं तर पोलीस अधिकारी म्हणजे तुमचा मोबाईल. तुम्ही कोणावर नियंत्रण ठेवायचं आणि तेरी झलक अशरफी… असं गुणगुणायचं हे ठरविण्यासाठी कालच्या आषाढीचा उपवास फळास येवो, हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. नाहीतर “पुष्पा”चा सिक्वल येणार आहेच.
- अतुल कोतकर
गुंतवणूक सल्लागार
94 23 18 75 98