महासम्राट : शिवकाळातील कालखंडावर झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या विश्वास पाटील यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली एक जबरदस्त कादंबरी

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे एक अतूट असे नाते आहे. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवराय असे म्हटले तर वावगे ठरणार. आजवर शिवरायांवर अनेक संशोधक आणि लेखकांनी लिहिले आहे तरीही संपूर्णपणे शिवराय आपल्यापर्यंत पोहचले का? महाराज आपल्याला उमगले का हा प्रश्न उरतोच. इतिहासाच्या उदरात अजूनही अनेक रहस्ये दडलेली आहेत, अनेक गोष्टंविषयी आपल्याला अजूनही सविस्तर माहिती मिळालेली नाही त्यामुळेच पानिपतकार विश्वास पाटील यांची ‘ महासम्राट ‘ कादंबरी मालिकेतील ‘ झंझावात ‘ ही कादंबरी महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक माहितीत नव्याने भर घालणारी ठरणार आहे हे नक्की.


आपण छत्रपतींविषयी बरेच काही वाचलेले असते त्या तुलनेत त्यांचे पिताश्री शहाजी राजांविषयी बहुतेकांचे वाचन काहीसे कमीच असते. महासम्राट कादंबरीची सुरुवातच मुळी शहाजीराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनाक्रमांनी होते. त्यांचे आणि मलिक अंबरचे जिव्हाळ्याचे संबंध वाचताना मलिक अंबरही आपल्याला नव्याने कळतात.
दिल्लीच्या जहांगीर आणि शहाजान या दोघा मातब्बर बादशहांच्या लष्करा विरुद्ध झुंज देणारे शहाजीराजे समजून घेताना इतिहासातील अनेक अप्रकाशित घटना लेखक विश्वास पाटलांनी आपल्यासमोर त्यांच्या खास शैलीत मांडल्या आहेत. शहाजी राजांसारखे पहाडासारखे पिता आणि जिजाऊसाहेबांसारख्या सागरासारख्या माता व शिवरायांसारखा युगप्रवर्तक पुत्र ! या तिघातील अंतर्गत भावभावनेचा काळानेच विणलेला विलक्षण सुवर्ण गोफ म्हणजे महसम्राट ही कादंबरी.


अहमदनगरच्या निजामशाहीचा महत्वाचा स्तंभ मलिक अंबरच्या मृत्यूनंतर काही वर्षातच शहाजी राजांनी संगमनेर जवळच्या पेमगिरी इथून निजामशाहीचा कारभार चालवायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी जीवधन किल्ल्यावर कैदेत असलेल्या निजामशाहीतील एक वारस मुर्तजा या लहान मुलाला मांडीवर घेऊन पेमगिरीच्या किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा घडवून आणला. पुढे सुमारे तीन साडेतीन वर्षे त्यांनी इथूनच निजामशाहीचा कारभार चालवला. यापूर्वी या विषयावर अतिशय त्रोटकपणे लिखाण झाले होते मात्र महासम्राटमध्ये याविषयी सविस्तरपणे वाचताना वाचकांचा उर नक्कीच अभिमानाने भरून येइल.

कादंबरीचा उत्कर्षबिंदू म्हणजे अफझल खानाचा वध. महाराजांवर चालून येण्यापूर्वी अफजलखानाने सलग पन्नास लढाया जिंकल्या होत्या. पराभव किंवा हार हा शब्द कधी त्याच्या आसपासही फिरकला नव्हता. त्यामुळेच विजापुराहून निघताना शिवाजीचा पराभव करून त्यांना आपण साखळदंडाने बांधून जिवंतच घेऊन येऊ असा वेडा विडा त्याने उचलला होता.
अफजलखानाच्या मालकीची अनेक गलबते दर्यात होती. त्याने गुपचूप गोव्यामार्गे कोकणात दाभोळच्या बंदरात तीन जहाजे आणून नांगरून ठेवली होती. त्याच्या स्वप्नाप्रमाणे तो जर शिवरायांना जिवंत पकडण्यात यशस्वी झाला तर विजापूरकरकडे जाताना वाटेत मराठे शेकडोंच्या जमावाने एकत्र येतील व शिवरायांना सोडवतील अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळेच महाराजांना पकडल्यावर कोकणाचे घाट उतरून रातोरात दाभोळ बंदरातून त्यांना समुद्रमार्गे गोव्याकडून विजापूरला पळवायचे असे स्वप्न त्याने बघितले होते.

इकडे शिवरायांच्या महासंघर्षासाठी सह्याद्रीच्या रानातील फक्त मावळे नव्हेत तर हजारो घोडी, खेचरे, तोफांचे बैल सारे चराचर कसे उतरले होते. त्यामुळेच महाराजांनी अफजलखानाच्या बेछुट स्वप्नांचा चुराडा करून प्रतापगडाच्या पायथ्यालाच त्याच्यासाठी कबर खोदायला कसे भाग पाडले. आपल्या प्रचंड श्रमाने प्रतापगडाच्या परिसरातील धनगर, गुरेवासरे , गवोगावचे पाटील , कुणबी आणि माता-भगिनींना आपल्या लढाईमध्ये कसे उतरवले. विजापुरी फौजेच्या मानाने आपले बळ कमी असतानाही शेवटी इतिहासाचे चक्र उलटेसुलटे कसे केले. कळीकाळाला सुद्धा प्रतापगडाच्या परिसरात मराठ्यांच्याच बाजूने तुतारी वाजवायला कसे भाग पाडले अशी क्षणोक्षणी अंगावर काटा उभा करणारी ती सारी चित्तथरारक कहाणी , आपल्या दीर्घ अभ्यासाच्या व निसर्ग पाहणीच्या बळावर कादंबरीकार विश्वास पाटील यांनी आपल्या “महासम्राट,” या नव्या कादंबरीत डोळ्यांसमोर साक्षात उभी केली आहे.


महासम्राट ही कादंबरीमाला मेहता पब्लिकेशन हाऊसने प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा पहिला भाग “झंजावात” हा एक ऑगस्ट रोजी प्रकाशित होत आहे. सध्या कादंबरीच्या पूर्व नोंदणीसाठी सवलतीची योजना सुरू आहे. सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी वाचकांना नजीकच्या पुस्तक विक्रेत्याकडे नोंदणी करता येईल. त्याचप्रमाणे ऑनलाईन सुद्धा हा खंड बुक करता येणार आहे. ऑनलाईन बुक करण्यासाठी https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MAHASAMRAT-ZANZAVAT/3619.aspx या लिंक वर क्लिक करावे.
“महासम्राट” ही कादंबरी वाचताना शिवरायांसोबत वाचकांना सुद्धा त्त्या युद्धात व युगात प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा थरारक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. शिवकाळातील अनेक अपरिचित व्यक्ती, प्रसंग व विलक्षण धगधगत्या कालखंडावर झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या विश्वास पाटील यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली एक जबरदस्त कादंबरी म्हणजेच महासम्राट !

  • किसन भाऊ हासे
    राज्य अध्यक्ष, संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई
    संस्थापक – दैनिक युवावार्ता, संगमनेर
    मो. ९८२२०३९४६०

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख