फटाके विक्रेते असोसिएशनची मुख्याधिकाऱ्यांकडे धाव
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – दिवाळीचा सण म्हणजे फराळ व कपड्यांसोबतच फटाके विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा सण असतो. दरम्यान फटाके विक्री करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेत, शासकीय परवानगी काढून तसेच खासगी जागा मालकाला भाडे देऊन, तात्पुरता स्टॉल उभारून फटाका विक्रेते आपला व्यवसाय करतात. तर दुसरीकडे अनेक फटाके विक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करून विना परवाना व धोकादायक पद्धतीने फटाके विक्री करतात. अशा अवैध व अनाधिकृत फटाके विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई करावी या मागणीसाठी आज बुधवारी संगमनेर फटाका विक्रेते असोसिएशनच्या सदस्यांनी पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या दालनात धाव घेत मागणी केली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर अधिकृत फटाका विक्रेते लाखो रूपये खर्च करून माल उचलतात. त्यानंतर शासकीय परवानग्यांसाठी धावपळ करत खासगी जागेत स्टॉल उभारतात. यासाठीही त्यांना मोठा खर्च कारावा लागतो. तर दुसरीकडे अनाधिकृत फटाके विक्रेते दिसेल त्याठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करून फटाक्याचे स्टॉल लावतात. दुय्यम दर्जाचे व कमी भाव लावून ग्राहकांना आकर्षित करतात. मात्र यामुळे अधिकृत फटाका विक्रेत्यांचे मोठ्याप्रमाणावर अर्थिक नुकसान होते. याबबात पालीकेकडे असोसिएशनच्या वतीने दरवर्षी तक्रार व विनंती अर्ज केले जातात. मात्र नगरपालीका, पोलीस स्टेशन याकडून त्यांना कुठलाही दिलासा मिळत नाही. अवैध फटाका विक्रेत्यांकडून गैर मार्गाने पैसे उकळून त्यांना पाठिशी घालण्याचे काम प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी करतात. मात्र हा गैरप्रकार इतर नागरीकांच्या जीवावरही बेतणारा आहे. अशा बेकायदेशीर फटाका विक्रेत्यांच्या व्यावसायावर बंदी घालावी व अधिकृत फटाका व्रिकेतांना जे नियम व निकष लावण्यात आले आहे. तेचे नियम त्यांच्यावर बंधनकारक करावे. या मागणीसाठी फटाका असोसिएशनचे अध्यक्ष पिंटू गाडे, संतोष मुर्तडक, सोमनाथ परदेशी, तुषार भगत, सचिन देशमुख, सागर भडांगे, सरोवर दारूवाला, अविनाश वाव्हळ, विशाल ढोले, सोन्या कोळपकर, धनंजय मुर्तडक यांच्यासह सदस्यांनी मुख्याधिकार्यांची भेट घेतली.