अगस्ती साखर कारखान्याचे बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ उत्साहात
युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले- सध्याची ऊसाची अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असल्याने राज्यातील सर्वच कारखाने गाळपाचे पुर्ण करण्याकरीता प्रयत्न करणार आहेत. अशाही परिस्थितीत अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी ठरलेल्या अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे गाळपाचे उद्ष्ठि पुर्ण करण्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकरी, सभासद, सर्व पक्षीय कार्यकर्ते कामगार कसोशीने प्रयत्न करुन पुर्ण करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कार्यक्रमात केले. यावेळी सर्व पक्षीय मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सभासद, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अगस्ति कारखाना कार्यस्थळावर आयोजित 30 वा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने झाला. बॉयलर अग्निप्रदिपन पुजन संचालक अशोकराव आरोटे, बादशहा बोंबले, सदाशिव साबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच संचालिका सौ. सुलोचना अशोकराव नवले व त्यांचे पती तसेच कारखाना कामगार अण्णासाहेब आभाळे व त्यांची सुविद्य पत्नी यांचे हस्ते पार पडला.
यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षीय सुचना संचालक विकासराव शेटे यांनी मांडली व त्यास अनुमोदन संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी दिले. त्यानंतर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक परबतराव नाईकवाडी प्रास्ताविकात म्हणाले की, कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. उसाची उपलब्धता अत्यंत कमी असून, सर्वांनी ऊस वाढीसाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी कॉ.कारभारी उगले म्हणाले की, सत्ताधारी व विरोधक यांनी सर्वांनी मिळून कारखाना चालविण्यासाठी प्रयत्न करु. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले म्हणले की, साखर उद्योगात सातत्याने अडचणी येत असतात. त्यावर मात करुन हा साखर उद्योग चालविला पाहिजे. त्यासाठी जिल्हा बँकेचे फार मोलाचे सहकार्य मिळालेले आहे. येथून पुढेही मिळेल. कारखाना चालविताना हे टिम वर्क आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी. तसेच शेतकरी व कामगार यांना बरोबर घेऊन कारखाना चालवावा असे आवाहन केले. याप्रसंगी शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मनोज मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश नवले यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी कारखान्याचा संपुर्ण आर्थिक लेखाजोखा मांडून सांगितले की, आपला कारखाना सातत्याने प्रतिकुल परिस्थितीतून वाटचाल करीत आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला कारखाना बंद राहणार नाही यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करु. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्यांनी नेहमीच प्रसंगी आर्थिक तोटा सहन करुन सुध्दा अगस्तिलाच उस दिलेला आहे. कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र अत्यंत कमी असल्याने आपणास कायम बाहेरुन उस आणावा लागत असतो. कार्यक्षेत्राबाहेरील शेतकरी सुध्दा आपल्या कारखान्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे बाहेरील ऊस सुध्दा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अत्यंत कमी दिवसांत कारखान्याचे संपुर्ण मशिनरीचे कामे पुर्ण करुन कारखाना सुसज्ज केलेला आहे.