निळवंडेसाठी खस्ता खाणारे राहीले बाजूला, भलतेच लाटतात श्रेय

अकोले- संगमनेरकरांची संतप्त भावना

निळवंडे धरणामुळे प्रामुख्याने अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव या तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे. तसेच लाखो लोकांची तहान भागणार आहे. मात्र या धरण व कालव्यांसाठी सर्वाधिक योगदान अकोले व संगमनेरकरांनी दिले आहे. मधुकरराव पिचड यांनी पुढाकार घेतल्यामुळे व शेतकर्‍यांची समजूत काढून कालव्यांसाठी जमिनी मोकळ्या केल्याने हे कालवे पुढे जाऊ शकले. बाळासाहेब थोरात यांनीही सातत्याने सत्तेच्या माध्यमातून चालना दिली. मात्र लोकार्पण सोहळ्यात यो दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती सर्वांना खटकणारी होती.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे व देश उभारणी करणारे यांचे योगदान विसरून आज भलतेच जण भारताचे भाग्य विधाते व विश्‍वनेते म्हणून मिरवीत आहे. अशीच अवस्था उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणासाठी ज्यांनी ज्यांनी खस्ता खालल्या त्या सर्वांचे योगदान बाजूला ठेवून व त्यांच्याच तालुक्यात येऊन देखील त्यांना दूर लोटून काल भलत्याच जणांनी निळवंडे धरणाचे व कालव्यांचे लोकार्पण केले. या कृतीमुळे अकोले व संगमनेर तालुक्यात संताप व्यक्त कला जात आहे.
भविष्यात भंडारदरा धरण लाभक्षेत्राची तहान व शेतीची भूक भागली जाणार नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, दत्ता देशमुख, भाऊसाहेब थोरात या जेष्ठ नेत्यांनी निळवंडे धरणाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी निळवंडेचा हा रथ पुढे नेला. पाणी, जमीन, पुनर्वसन, निधी, पर्यावरण, शेती, अनेक मंजुर्‍या, न्यायालयीन लढाई पार करून अखेर नऊ टी एम सी चे निळवंडे धरण पुर्ण झाले. तसेच त्यावरील दोन्ही कालवे देखील लवकरच पुर्णत्वास जात आहे. निळवंडे धरण व कालव्यांना मोठा कालावधी लागला हे खरे आहे, परंतु त्यासाठी अनेक अडचणीचा सामना देखील करावा लागला हे सर्व लाभक्षेत्राची जनता जाणते. मधुकरराव पिचड व आ. बाळासाहेब थोरात यांचे या धरणासाठी योगदान कुणी नाकारू शकत नाही तर विरोध कुणी केला हे सर्वांना माहीत आहे.


दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते निळवंडे धरणाचा लोकार्पण सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. परंतु सर्वांच्या नजरा या भाजपचेच जेष्ठ नेते मधुकरराव पिचड किंवा माजी आमदार वैभव पिचड यांना शोधत होत्या. मात्र ज्यांचा या धरणाशी, त्यासाठीच्या संघर्षाशी कोणताही संबंध नव्हता असे नेते या सोहळ्यात मिरवत होते. तसेच ज्यांच्या योगदानाबद्दल, संघर्षाबद्दल या नेत्यांकडून साधा नामोल्लेख केला जात नसल्याने हा सोहळा पाहताना अकोले व संगमनेर तालुक्यातील जनता मात्र संतप्त भावना व्यक्त करत होती.
माजी मंत्री मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान आहे. धरणाच्या भिंतीतील पहीला वाहिला दगड ठेवण्याचे अत्यंत अवघड काम त्यांनी केले. आदर्श पुनर्वसन तेही केवळ अकोले संगमनेर तालुक्यात करुन धरणाच्या कामाला खरी गती पिचड दिली. निळवंडे धरणाबाबत कोणी कितीही फुशारक्या मारल्या आणि खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी अकोले, संगमनेर तालुक्यातील जनता सत्य जाणणारी आहे. त्यामुळे काल या जेष्ठ नेत्यांचा यथायोग्य सन्मान होणे उचित असताना व त्यातही राजकीय अडचण म्हणून बाळासाहेब थोरात यांना बाजूला ठेवले असते तरी एकवेळ जनतेने समजून घेतले असते. परंतु स्वपक्षाचे नेते मधुकरराव पिचड किंवा वैभव पिचड यांना बाजूला ठेवने योग्य नव्हते. शासनाच्या या भुमिकेचा अकोलेकरांनी व संगमनेरकरांनी तीव्र निषेध केला आहे. निळवंडे धरणाच्या कोनशिलेवर पिचड यांचे नाव नसावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत धरण लोकार्पण सोहळ्यात पिचड यांचा समावेश जाणिवपूर्वक टाळुन पालकमंत्र्यांनी अकोलेकरांच्या भावना दुखावल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख