संगमनेरचे विद्यार्थी देशाचा नावलौकिक वाढवतील – राजेश मालपाणी

0
1661


उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचा संगमनेर मर्चंट बँकेतर्फे सत्कार


संगमनेर, प्रतिनिधी
उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये जात असलेले संगमनेरचे विद्यार्थी आपल्या चमकदार कामगिरीने जगामध्ये देशाचा नावलौकिक नक्कीच वाढवतील असा आत्मविश्वास उद्योगपती राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला. संगमनेर मर्चंटस बँकेच्या वतीने अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी जात असलेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी मालपाणी बोलत.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मनीष मालपाणी, स्किनवेस्ट या ब्युटी ब्रँडच्या प्रणेत्या दिव्या मालपाणी, बँकेचे चेअरमन संतोष करवा, व्हाईस चेअरमन प्रकाश कलंत्री आदी उपस्थित होते. सिमरन अत्रे, जय गाडे, गंधार पानसरे, चिदंबर धापटकर, प्रणव पगडाल, तन्मय राठी, ओम कोळपकर, धनंजय सोनवणे, आयुष पडतानी या विद्यार्थ्यांनी विविध विद्याशाखांमधील उच्च शिक्षणासाठी अमेरिका आणि इंग्लंड येथील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यासाठी येणारा खर्च बराच मोठा असल्याने जरूरी प्रमाणे संगमनेर मर्चंट बँकेच्या वतीने त्यांना आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी म्हणजे बुद्धिमत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर आपल्या मातृभूमीचे नाव झळकविणारे ‘टॉप टेन’ विद्यार्थी ठरतील असा आत्मविश्वास मालपाणी यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
चाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये शिक्षण घेताना आलेले अनुभव मालपाणी यांनी विद्यार्थी आणि पालकां समोर सांगितले. आपण केवळ विद्यार्थी नाही तर भारताचे एंबेसडर म्हणून जात आहात, आपण देशाचे नाव नक्की उंच कराल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जय मालपाणी यांनी इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये शिक्षण घेताना कोणकोणत्या दक्षता घेतल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहार आणि व्यायाम याकडे लक्ष देऊन सर्वांनी शंभर टक्के तंदुरुस्त राहण्याची काळजी घ्यावी ग्रंथालयांचा व जिमचा पुरेपूर उपयोग करावा अर्धवेळ नोकरी करून कमवा व शिका या धोरणाचा अवलंब करावा विदेशामध्ये विद्यार्थी म्हणून प्रत्येक क्षेत्रात मिळणार्‍या सवलतींचा लाभ घ्यावा यासह अनेक महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.


दिव्या मालपाणी यांनीही विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वपूर्ण बाबी समजावून सांगितल्या. तुमचे स्वप्नं साकार करण्याची सुवर्णसंधी तुमच्या गुणवत्तेमुळे तुम्हाला मिळाली आहे. संगमनेरमधून थेट विदेशात जात असल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आता ग्लोबल होणार आहे. तुमच्या मनातील सर्व स्वप्नं साकार करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला चालून आली आहे असे सांगून प्रवासाच्या पूर्वतयारी पासून तर विदेशात गेल्यानंतर तिथे सर्वांच्या मध्ये कसे मिसळून सांस्कृतिक आदान प्रदान करावे आणि तेथील जे जे उत्तम आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा मात्र हे सर्व करीत असताना सतत आपल्या परिवाराशी संपर्क ठेवावा असे दिव्या मालपाणी यांनी आवर्जून सांगितले. कोणतेही काम कमीपणाचे नसते व मीही तिथे जिमसुपरवायझरचे काम करून अनुभव व अर्थसहाय्य मिळविलेची माहिती तिने दिली.
बँकेचे चेअरमन संतोष करवा यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची परंपरा महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यासह अनेक भारतीयांनी आपल्या उच्च गुणवत्तेने सुवर्णाक्षरात लिहून ठेवली आहे असे सांगितले. संगमनेर सारख्या तालुक्याच्या ठिकाणची ही मुले शिक्षणासाठी जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये जात आहे ही गोष्ट संगमनेर करांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आहे असे करवा म्हणाले. व्हाईस चेअरमन प्रकाश कलंत्री यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुनाखे यांनी सर्व विद्यार्थ्यांना विदेशामध्ये हिंदू सेवा संघ या संघटनेशी संपर्क ठेवून अडीअडचणींवर सहजगत्या मात करता येऊ शकेल असे सांगितले.


कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबांच्या प्रतिमेला जय मालपाणी व दिव्या मालपाणी यांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना सत्कारामध्ये भेटवस्तू म्हणून चेअरमन संतोष करवा यांच्या वतीने छानश्या लॅपटॉप बॅग समवेत राजेश मालपाणी तर्फे ओपन सिक्रेट हे आत्मचरित्र आणि स्वर्गीय उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी यांनी त्यांना देश विदेशात शिकत असताना लिहिलेल्या पत्रांचे पत्र संस्कार ही पुस्तके व सोबत एक प्रेरक पत्र देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे भव्य चाळीस फुटांचा भव्य पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी उच्च शिक्षणासाठी मर्चंट ने दिलेल्या अर्थसहाय्याबद्दल आपआपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक महेश डंग यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांनी केले. जय मालपाणी व दिव्या मालपाणी यांचा परिचय संचालक सम्राट भंडारी यांनी करून दिला. कार्यक्रमाला बँकेचे संचालक सर्वश्री राजेंद्र वाकचौरे, मधुसूदन नावंदर, मुकेश कोठारी, रवींद्र पवार, श्याम भडांगे, सौ कीर्ती करवा, डेप्युटी जनरल मॅनेजर विजय बजाज, असिस्टंट जनरल मॅनेजर विठ्ठल कुलकर्णी आदींसह विद्यार्थांचे पालक व शहरातील मान्यवर प्रतिष्ठित उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या सत्कार व अनुभवातून दिशा देणार्‍या सोहळ्याचे व परदेशी जाणार्‍या विद्यार्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here