पुढील राजकीय भुमिका लवकरच करणार जाहीर
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे – विधानपरिषदेच्या चार जागांचा निकाल जाहीर झाला मात्र सर्वांना उत्सुकता होती ती नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निकालाची. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणार्या व मतमोजणीत सुरवातीपासून आघाडीवर असणार्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी 30 हजारांच्या फरकाने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. आ. बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे यांच्या अपक्ष आमदार होण्याची परंपरा सत्यजित तांबे यांनी कायम ठेवत ऐतिहासिक विजय संपादन केला.
नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारीवरून अनेक घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेरकडे लागले होते. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन काँग्रेससह सर्वच पक्षाला बुचकळ्यात पाडले होते. भाजपाने नाकारल्या नंतर शुभांगी पाटील ठाकरे गटात दाखल होऊन महाआघाडी पुरस्कृत उमेदवार बनल्या. तर डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे यांनी आपल्याला सर्व पक्षीय पाठिंबा आहे असे म्हणत भाजप पासून थोडे अंतर ठेवून राहिले. आपण आजही काँग्रेस विचारधारेचेच असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले. त्यामुळे राजकीय विश्लेषक व मतदारांमध्ये काहीसा गोंधळ राहीला. अपक्ष उमेदवारी करून सर्व पक्षांची मदत घेत सत्यजीत तांबे यांनी आपला प्रचार सुरूच ठेवला.
सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमध्ये काम करत तालुक्यापासून सुरवात करून युवक प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे असल्याची ओळख, तसेच या मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून डॉ. सुधीर तांबे यांनी केलेले काम व त्यातून निर्माण केलेला दांडगा जनसंपर्क सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरला. शेवटच्या क्षणी भाजपाने बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे सत्यजीत तांबे यांचा विजय आणखीच सुखकर बनला.
नाशिक पदवीधर मतदर संघासाठी काल नाशिक येथे मतमोजणी प्रक्रिया पुर्ण झाली. येथील मतमोजणी दुपारी सुरू झाल्याने निकालही उशिरा लागला. सायंकाळी पहिल्या फेरीचा निकाल लागला आणि सत्यजीत तांबे यांनी शुभांगी पाटील यांच्यावर 7922 मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासूनची घेतलेली आघाडी शेवटच्या फेरपर्यंत कायम ठेवत सत्यजीत तांबे यांनी 29 हजार 465 मतांनी दणदणीत विजय संपादन केला. तर महाआघाडीच्या शुभांगी पाटील यांना 39 हजरा 534 मते मिळाली. विशेष म्हणजे पदवीधरांच्या या निवडणूकीत 12 हजार 997 मते बाद झाली.
सर्वपक्षीय ठरलेले सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर पाचही जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. संगमनेरातही रात्री उशिरा कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. दरम्यान आज संगमनेरात साध्या पद्धतीने हा आनंदोत्सव साजरा करत सत्यजित यांनी सर्वांशी हितगुज साधले. तसेच गेल्या काही दिवसांतील घडलेल्या घडामोडींवर लवकर आपण विस्तृत भाष्य करून पुढील राजकीय दिशा ठरवू असे नुतन आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
सत्यजितने अपक्ष राहूनच काम करावे – डॉ. तांबे
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरून सत्यजीत तांबे आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर, महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. तिन्ही पक्षांचा पाठिंबा असताना सत्यजीत तांबेंनी शुभांगी पाटलांचा पराभव केला आहे. या विजयानंतर सत्यजीत तांबेंचे वडिल सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले.
प्रसारमाध्यमांशी बोलतांना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, मी तेरा वर्ष या मतदारसंघातून निवडून गेलो आहे. येथील लोकांनी खूप प्रेम दिले आहे. सत्यजीतवर विश्वास दाखवत आमच्या परिवारावही विश्वास टाकला आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे हेच सत्यजीतचं उद्दिष्ट असले पाहिजे. मी पहिल्यांदा अपक्ष निवडून आलो. सत्यजीतही अपक्ष निवडून आला. राजकीय भविष्य आपल्याला घडवावे लागते ते पक्षावर अवलंबून नसते. म्हणून सत्यजीतने जास्तीत जास्त लोकांना जोडत अभ्यासपूर्ण रितीने विधिमंडळात काम करावे, असा सल्ला डॉ. तांबेंनी दिला. अजित पवारांनी काँग्रेसला दिलेल्या कानपिचक्याबद्दल बोलतांना डॉ. तांबेंनी सांगितले, शरद पवारांनी यापूर्वीही भूमिका मांडली होती की, सामंजस्यपणाने हा प्रश्ना सोडवता आला असता. तिच भूमिका अजित पवारांनी मांडली. वर्षोनुवर्षे आम्ही पक्षात काम करत आहे. संवादाद्वारे हा प्रश्न मिटला असता असे डॉ. तांबे म्हणाले. सत्यजीत तांबे कुणाला पाठिंबा देणार यावर डॉ.तांबेंनी म्हटले की, सध्या सत्यजित अपक्षच आहे. माझा सल्ला आहे की त्याने अपक्षच राहावे.