व्यापाऱ्यांना सक्तीने बंद करायला भाग पाडल्यास कठोर कारवाई
संगमनेर उपविभागात यापुढे गुन्ह्याला माफी नाही – डीवायएसपी वाघचौरे

संगमनेर (प्रतिनिधी) – शहरातील जोर्वे नाका येथील घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपींना गजाआड केले आहे. त्याचबरोबर वादाला कारणीभूत असणारे अतिक्रमण प्रशासनाने काढून टाकले आहे. या घटनेतील कोणत्याही गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही त्यामुळे संगमनेर बंद करण्याचा किंवा मोर्चा काढण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र तरीही काही संघटनांकडून संगमनेर येथे काढण्यात येणार्या भव्य भगव्या मोर्चाला पोलिस प्रशासनाने अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही.
काही नियम व अटीवर जरी परवानगी दिली तरी या मोर्चात कोठेही काही गडबड घडल्यास संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. तसेच आयोजकांकडून फक्त मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून कोणताही बंद पुकारण्यात आलेला नाही. मात्र येथील व्यापार्यांना जबरदस्तीने बंद करायला भाग पाडल्यास मोर्चा आयोजकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे.
संगमनेर उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भविष्यातील आपली वाटचाल यावर भाष्य करत त्यांनी उद्याच्या भगव्या मोर्चा संदर्भात भाष्य केले. यावेळी बोलताना डीवायएसपी वाघचौरे म्हणाले की, आपण नागपूर सारख्या मोठ्या गुन्हेगारीच्या क्षेत्रात काम केले आहे. तेथे भूमाफिया टोळीवर आपण राज्यात सर्वात मोठी कारवाई केली आहे. या भूमाफियांवर मोक्का सारखा गुन्हा दाखल करून आज 9 वर्षांनंतरही यातील आरोपी जेलमध्ये आहेत. तर ज्यांच्या जमिनी बळकाविण्यात आल्या होत्या अशा सुमारे 2300 जणांना आपण जमीन परत मिळवून दिली आहे. त्यानंतर भुसावळ सारख्या शहरातील गुन्हेगारी आपण मोडून काढली आहे. येथील जवळपास 80 पेक्षा जास्त गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्यामुळे संगमनेरातही आपण काम करताना काही प्राधान्यक्रम ठेवला आहे. त्यात ज्या गुन्हेगारांवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा सर्वांची प्राधान्यक्रमाणे यादी बनविण्यास सुरूवात केली आहे. यातील त्यांच्या गुन्ह्यांच्या संख्येवरून व गंभीरतेवरून त्यांच्यावर लवकरच पुढील कारवाई सुरू होईल. त्यानंतर संगमनेर उपविभागात जो गुन्हेगार गुन्हा करेल त्याला पाठीशी घालण्यास कितीही मोठा दबाव आला तरी आपण तो झुगारून लावून आरोपीला सोडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही आरोपींना पाठीशी घातले जाणार नाही. यापुढे या विभागात गुन्हेगाराला ‘माफी’ नाही असा इशाराच एकप्रकारे वाघचौरे यांनी दिला आहे.
संगमनेरातील बेशीस्त वाहतूक, अवैध धंदे, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांची ‘पेट्रोलिंग’ वाढविण्यावर भर देणार असून गुन्हेगारांना व बेशीस्त नागरिकांना वारंवार समजून सांगण्याच्या भानगडीत न पडता कायद्याने कारवाई करणार असल्याचे वाघचौरे म्हणाले. अवैध वाहतूक, विना नंबर वाहने, मोठ्या आवाजातील सायलेसंर अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई न करता जागेवरच त्यावर कायमस्वरूपी उपाय करणार आहे. शहरातील जे क्षेत्र संवेदनशील आहे किंवा ज्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये आहेत अशा ठिकाणी टवाळखोरांवर कारवाईसाठी पथक नेमणार आहे. पोलिस स्टेशनला आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी ‘पोलिसराज’ व्यवस्था सक्षम करणार आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी किंवा त्याला पाठीशी घालणारा कोणीही असला तरी त्यांची हयगय केली जाणार नाही. याबाबत सक्त सूचना या विभागातील पोलिस अधिकार्यांना दिल्या आहेत असेही ते म्हणाले.
मंगळवारी आयोजित भव्य मोर्चासंदर्भात डीवायएसपी वाघचौरे म्हणाले, आयोजकांनी मोर्चा व बंद संदर्भात निवेदन दिलेले आहे. मात्र यात बंद मागे घेण्यात आला असून केवळ मोर्चासाठी परवानगी मागितली आहे. मात्र सर्व परिस्थिती पाहता, मोर्चा मार्गाचा आढावा घेता, मोर्चासाठीच्या नियम-अटीचा आढावा घेता अद्यापपर्यंत या मोर्चाला पोलिस विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. सर्व बाबींचा विचार करता आज संध्याकाळपर्यंत या मोर्चाला परवानगी द्यायची की नाकारायची याबाबत निर्णय होणार आहे. मात्र जर परवानगी दिली तर त्यासाठी कठोर नियम-अटींचे पालन मोर्चेकरांना करावे लागणार आहे. मोर्चात येणार्या नागरिकांची सुविधा, त्यांना पाणी-वाहतूक, पार्किंग याची सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तसेच मोर्चाप्रसंगी कोणत्याही व्यापार्यावर दुकाने बंद करण्याची सक्ती आयोजकांना करता येणार नाही. मोर्चात कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक भाषण अथवा गुन्हेगारी प्रवृत्ती असणार्या इसमाला भाषण करण्यास मज्जाव घालण्यात येणार आहे. मोर्चाप्रसंगी वापरण्यात येणारे झेंडे याची काळजी मोर्चेकरांना घ्यावी लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मोर्चा संपल्यानंतर जे आंदोलक मागे राहणार आहे त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. अनेक वेळा मागे राहणारे काहीजण विचित्र घटनेला कारणीभूत ठरतात. त्यामळे अशा आंदोलकांवर पोलिस खास लक्ष ठेवणार आहे. त्याचबरोबर या मोर्चासंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरवू नये अथवा द्वेषपूर्ण संदेश पाठवू नये. असा संदेश कोणत्याही सोशल मीडियावर आढळून आला तर त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्यात येणार आहे असा गंभीर इशारा डीवायएसपी वाघचौरे यांनी दिला आहे.
यावेळी शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे उपस्थित होते.