मालदाड रोडवरील त्रासदायक भाजी मार्केट हटवा – नागरिकांचे निवेदन

0
1616

भाजी विक्रेत्यांच्या अरेरावी वर्तनाने व रस्त्यांवरील अतिक्रमणाने नागरीक हैराण

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील मालदाड रोडवरील भाजी मार्केटला तेथील रहिवासी व व्यापारी कंटाळले असुन हे भाजी मार्केट येथून हटवावे अशी मागणी करणारे निवेदन या परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेला दिले. याप्रसंगी व्यापारी असोशिएशचे अध्यक्ष योगेश कासट, अ.भा.माहेश्‍वरी महासभेचे सदस्य अनिष मणियार, अशोक कोकणे, डॉ.सचिन सातपुते, उदय मुळे, रामेश्‍वर राठी, आदित्य जाधव, शुभम कानवडे, दीपक मणियार आदींनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहूल वाघ यांना भेटून या समस्येतून नागरीकांची सुटका करण्याची विनंती केली. त्यानुसार येत्या आठ दिवसात याबाबत योग्य निर्णय घेऊन मालदाड रोडकरांना दिलासा दिला जाईल असे आश्‍वासन मुख्याधिकारी यांनी दिले.


या निवेदनात म्हटले आहे की, विद्या विहार कॉलनी, सौभाग्य कॉलनी, गिरीराज नगर, परिस कॉलनी, शिवाजी नगर व मालदाड रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत आहे. तसेच या परिसरात हॉस्पिटल, बँका देखील आहेत. कोरोना कालावधीत मालदाड रोड परिसरातील शिवाजी नगर चौकात भाजी बाजार सुरू झाला. त्यावेळेची गरज म्हणून सदर भाजी बाजारास कोणीही विरोध केला नाही. परंतु आता सदरचा भाजी बाजारात भाजी व इतर साहित्यांची विक्री करणारे व्यापारी व शेतकरी यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असुन, त्याला बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या परिसरात नागरीकांना पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे. मोटार सायकल मोठ्या प्रयत्नांनी त्यांना घराजवळ आणवी लागते. तर दुपारनंतर चार चाकी वाहनाने ये जा करणे मुश्कील झाले आहे. परिणामी त्यांची चारचाकी वाहने असुनही ती त्यांना अन्यत्र पार्कींग कराव्या लागतात. याबाबत संबंधीतांना विचारणा केल्यास भांडणे करतात, सदर जागेवर आम्हाला नगर परिषदेने परवानगी दिलेली आहे. तुमची जागा नाही, अशी अरेरावीची भाषा करतात. तसेच या परिसरात मालपाणी हॉस्पिटल व अन्य हॉस्पिटल देखील असुन, तातडीच्या सेवेसाठी रूग्नवाहिका आणणे देखील अवघड झालेले आहे. त्यामुळे सदरचा भाजी बाजार अन्यत्र हलवुन आम्हाला दिलासा द्यावा, अन्यथा आम्ही सदरचा भाजी बाजार या परिसरात चालु ठेवण्यास सामुहिक विरोध करणार आहोत. त्याबाबत काही कायदेशिर प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहिल याची नोंद घ्यावी. असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वाघ यांनी येत्या आठ दिवसात याबाबत योग्य निर्णय घेऊन मालदाड रोड करांना दिलासा दिला जाईल असे आश्‍वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here