म्हाळुंगी पुलाच्या श्रेयासाठी राजकीय चढाओढ लाजिरवाणी – जाखडी

0
1682

त्रासलेल्या लोकांसाठी म्हाळुंगीचा पूल महत्त्वाचा, नेते नव्हेत !

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – म्हाळुंगी नदीवरचा पूल कोसळून एक वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला. या काळात नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. मात्र अजूनही श्रेयावादाच्या नादात त्यासाठी होत असलेले पक्षीय राजकारण आणि गटबाजी यामुळे निविदा देण्यात येऊनही अद्याप काम दृष्टीपथात नाही. ही संगमनेर शहराच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. श्रेय लाटण्यासाठी सुरु असलेले शीतयुद्ध नागरीकांचा बळी घेणारे ठरले तर यांना समाज कधीही माफ करणार नाही. या पुलासाठी मी स्वतः प्रांत कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी शीर्षासन आंदोलनासह प्राणांतिक उपोषण करणार असून लोकांच्या हितासाठी मला माझ्या जीवाची पर्वा नाही. कारण पुलाचा होत असलेला राजकीय खेळ सहनशक्तीच्या पलीकडे चालला आहे. असा सज्जड इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


लोकांच्या भावनांशी क्रूर खेळ करून पूल निर्मितीस विलंब करणारे सर्वच राजकीय पक्ष, गट आणि विविध नेत्यांचे चेले – चपटे हे निषेध करण्याच्याच लायकीचे ठरले आहेत. कामाची निविदा निघालेली असतांना त्यात खोड्या काढून खोडा घालण्याची विकृती करून काहीही साध्य होणार नाही. खरे तर इतका महत्वाच्या मार्गावर असलेला पूल एवढ्या दिवसात पूर्ण व्हायला हवा होता. मात्र प्रत्येक नेत्याला आपापले उल्लू सीधे करून घ्यायचे आहेत. असा संशय घ्यायला खूप वाव आहे. एखाद्या समस्येचे किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जाते याचे संगमनेरकरांना अनुभव होत आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरात विकास कामे कमी परंतू श्रेयवादाचे राजकारण जास्त रंगताना दिसत आहे. कुणाला नगरपालिका निवडणुकीसाठी पूल वापरायचा आहे, तर कुणाला विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त साधायचा आहे, अशी लोकांमध्ये असलेली चर्चा खरी ठरत आहे. सौ शहरी एक संगमनेरी ही म्हण खरी ठरावी यासाठी लढाऊ संगमनेरकर राजकारण विरहीत आणि पक्ष तसेच गट विरहीत जन आंदोलन करून शासनाच्या बोटचेप्या धोरणावर तोडगा काढल्या शिवाय राहणार नाहीत असेही भाऊ जाखडी यांनी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here