तरूणाची पावणे तीन लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
1816

ऑनलाईन कर्ज व खरेदीच्या माध्यमातून लाखाेंचा गंडा

संगमनेर – तालुक्यातील शेडगाव येथील ३३ वर्षीय तरुणाच्या नावावर सायबर भामट्याने तब्बल २ लाख ५५ हजारांचे ऑनलाईन कर्ज व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून २६ हजारांची खरेदी करत अशी एकूण २ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. बँकेने या तरुणाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी फोन केल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली. याबाबत फसवणूक झालेल्या उच्चशिक्षित तरुणाने दिलेली माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी हा तरुण मुंबई येथील अंधेरी परिसरात खाजगी सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. परंतु तीन वर्षांपूर्वी आलेल्या करोनाच्या जागतिक आरोग्य संकटात त्याला आपली नोकरी गमवावी लागली होती. हा तरुण वर्षभरापासून शेडगाव (ता. संगमनेर) या आपल्या मूळ गावी राहत आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे २३ जून २०२३ ला त्याला मोबाईल वर फोन आला व तुम्ही मुंबई येथे कामाला होता व त्यावेळी तुमच्या असलेल्या बँक खात्याचे केवायसी करायचे असल्याने आधार नंबर मागितला. त्या व्यक्तीने दिलेली माहिती बरोबर असल्यामुळे या तरुणाचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यामुळे त्याला खाते नंबर, आधार नंबर व पॅनकार्ड नंबर देऊन आलेला ओटीपी नंबर देखील सांगितला होता. यानंतर शेडगाव येथील पत्त्यावर बँकेचे क्रेडिट कार्ड देखिल आले होते. नुकताच बँकेच्या पुणे कार्यालयातून कर्जाचा हप्ता भरण्यासाठी फोन आल्यामुळे या तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली.

आपण कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नसताना हा हप्ता कशासाठी भरायचा याबाबत तरुणाने बँकेकडे चौकशी केली असता नेटबँकिंग द्वारे २ लाख ५५ हजारांचे पर्सनल लोन तसेच क्रेडिट कार्डवरून २६ हजार रुपयांची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे २ लाख ८१ हजारांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री या तरुणाची झाल्यामुळे त्याने आश्वी पोलीस ठाणे व नंतर नगर येथील सायबर विभागाला फसवणुकीबाबत माहिती व कारवाई बाबत निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here