चालक परवाना फाडून वाहन चालकांचे आंदोलन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा केला आहे. या कायद्यानुसार अपघात झाल्यास संबंधित ट्रक वाहन चालकाला सहा ते आठ लाखांपर्यंत दंड व दहा वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारचा हा कायदा जुलमी असून जर हा कायदा मागे घेतला नाही तर प्रसंगी शेळ्या वरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू पण ट्रक चालविणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेत तालुक्यातील पठार भागातील चालकांनी आपले वाहन चालकाचे परवाने ( लायसन्स) फाडून केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच घारगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत वाहन चालकांच्या संपात सहभागी झाले.
केंद्र सरकारने नुकताच नवीन मोटार वाहन अपघात कायदा केला आहे. हा कायदा सर्वस्वी वाहन चालकांच्या विरोधात असून ट्रक चालकांच्या जीवावर घाव घालणारा आहे. या कायद्यात एखादा अपघात घडल्यास चालकाला सहा ते आठ लाखांचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच तुरुंगवासाची देखील तरतूद करण्यात आली आहे. या विरुद्ध ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. तालुक्यातील आंबी खालसा येथे पठार भागातील शेकडो वाहन चालकांनी आंदोलन करत सरकारचा निषेध केला. यावेळी वाहन चालकांनी संतप्त भावना व्यक्त करत जर आमची सहा, सात लाख रुपये दंड भरण्याची क्षमता असती तर आम्ही दुसर्यांच्या गाड्या कशाला चालविल्या असत्या. आणि कोणताही अपघात हा वाहन चालक जाणीवपूर्वक करीत नाही. खराब रस्ते, चुकीचे स्पिड ब्रेकर, चुकीचे दिशादर्शक फलक, वाहन खराबी, पोलिसांचा ससेमिरा, दुचाकी चालक व पादचार्यांच्या चुका यासह अनेक कारणे अपघाताला कारणीभूत असतात. मात्र ते सोडून केवळ ट्रक चालकांना दोषी ठरवून कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेले जुलमी कायदे रद्द करावे अशी मागणी यावेळी ट्रक चालक आंदोलकांनी केली.
तसेच शासनाने आम्हाला वाहन परवाना दिला मात्र आमच्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या लायन्सचा आम्हाला कुठलाही लाभ होत नसून हे लायसन्स फाडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच घारगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत संपात सहभागी झाले. ट्रक चालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला असल्याने अनेक उद्योगांना त्याचा फटका बसत आहे. पेट्रोल पंपही त्यामुळे ठप्प पडू लागले आहे.