कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानच्या शिवार फेरीत शेतकऱ्यांनी अनुभवले टोमॅटोच्या यशाचे रहस्य

नियोजन, सातत्य, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टोमॅटो ह्या लाल सोन्याद्वारे भरघोस उत्पन्नाची संधी

युवावार्ता ( प्रतिनिधी) संगमनेर – अचूक नियोजन, सातत्य, नवीन तंत्रज्ञान आणि बाजाराचा अभ्यास करून टोमॅटो लागवड केली तर द्राक्षानंतर टोमॅटो हे मुबलक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्याचा दृढविश्वास २५ एकरातील टोमॅटो पिकाच्या शिवार फेरीत शेतकऱ्यांना निर्माण झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत टँकरच्या पाण्यावर टॉमॅटोने फुललेला परिसर शेतकऱ्यांना आनंद आणि प्रेरणा देणारा ठरला. कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानतर्फे सोनोशी येथे टोमॅटो पिकावरील चर्चासत्र, शिवार फेरी आणि शेतकरी संवाद यात्रेसाठी नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने टोमॅटो उत्पादक शेतकरी, कामगार, कृषी संशोधक, कृषी अधिकारी, दुकानदार, नर्सरी, औषध कंपनी, व्यापारी आणि ग्राहक सगळे घटक प्रथमच एकाच बांधावर एकत्र आणून शेतकऱ्यांच्या शंका समाधान करण्यात आले.

लाल सोने ठरलेल्या टोमॅटो पिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अव्वल ठरलेल्या गिते परिवारातर्फे कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलेले आहे. या माध्यमातून गिते परिवाराकडून शेतकऱ्यांना उन्नत आणि प्रगत करून भरभराट करण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केले जाते. ह्याच वर्षी १६ मे ह्या दिवशी टोमॅटोला ५० रुपये जाळी असा अल्प भाव होता. २ रुपये किलोला भाव असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले. त्या काळात गिते परिवाराने २५ एकरात टोमॅटोची सूत्रबद्ध लागवड केली. मागे वळून पाहिले तर सरासरी २ हजार रुपये जाळी याप्रमाणे लाखो रुपयांच्या हजारो जाळ्या टोमॅटोची विक्री केली. याबद्दल उपस्थित अधिकारी आणि शेतकऱ्यांतर्फे सोनोशी ग्रामस्थांनी प्रतिनिधिक स्वरूपात नाशिक जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधीक्षक अभियंता इंजि. हरिभाऊ कारभारी गिते यांचा नागरी सत्कार केला.

आजच्या कार्यक्रमाद्वारे प्रतिकूल परिस्थितीत फुलवलेल्या टोमॅटोच्या २५ एकरातील प्रेरणादायी यशोगाथा उत्पादक शेतकऱ्यांना अनुभवता आली. राहुरी कृषी विद्यापीठाचे भाजीपाला रोगशास्त्रज्ञ डॉ. बी. टी. पाटील यांनी भाजीपाला पैदास विषयावर तर भाजीपाला कीटक शास्त्रज्ञ प्रा. एस. ए. पवार यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. पुणे येथील टोमॅटो एक्सपर्ट प्रतीक मोरे यांनी अनेक विषय शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी संगमनेर तालुक्यातील भाजीपाला पिकांच्या आढावा घेतला.

विश्व हायटेक नर्सरीचे विरेंद्र थोरात यांनी नर्सरी मधील नियोजनाचे सूत्र सांगितले. व्यापारी राजूशेठ अभंग यांनीही प्रत्यक्ष पीक पाहणीत शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना दिलीप शिंदे यांनी गिते कुटुंबाशी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शेती संबंधी सर्व घटक एकत्र आणून एक आगळा वेगळा कार्यक्रमाबद्दल शिवार प्रतिष्ठानचे कौतुक केले. कृषी आणि ऋषी संस्कृती एकत्र आली तर शेतकरी सुखी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जाखोरी येथे होणाऱ्या कृषी आणि ऋषी कार्यक्रमाची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. राजेंद्र सानप, किसनराव सुपेकर, मोहन काकड, विठ्ठल सानप, पुंजाजी सानप आदी मान्यवर कनी बी. एन. फड, शिवाजी आवटे, महेंद्र निकम, राहुल वाबळे, योगेश गोरे, कैलास पगार, गौरव ठोक आदी टोमॅटो उत्पादक शेतकरी उपस्थित होते. फ्रूटवाला बागायतदारचे गणेश नाझिरकर आणि अजित कोरडे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. एल. के. गिते यांनी आभार मानले.


टोमॅटोच्या शेती संबंधी सर्व घटक शेताच्या बांधावर एकत्र आणून सकारात्मक चर्चा घडवून आणली. यासाठी कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानचे आभारी आहोत. – बी. एन. फड, शेतकरी, पारनेर

शेतकऱ्यांनी टेक्नोसेवी व्हावे यासाठी सोशल मीडिया वर चांगले शेतकरी मित्र जोडले तर लागवड, पिकांची चर्चा करता येते. विविध विभागातील परिस्थितीची जाणीव यातून करून घेता येते. शासनाच्या वेबसाईटवर देशभरातील आवक आणि बाजारभावाची माहिती मिळते. – इंजि. हरिभाऊ गिते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी नाशिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख