हुकुमशाहीला विरोध आणि लोकशाही वाचविण्यासाठीचा लढा जन सहभागाने पुढे नेण्यासाठी सभा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची तोफ अहमदनगरमध्ये धडाडणार आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनोच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. येत्या मंगळवार दि. 20 फेब्रुवारीला वागळे यांची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. अहमदनगर लोकशाही बचाव मंचाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
सायंकाळी 5.30 वा. माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन येथे सभा होणार आहे. लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ऐतिहासिक इंडियन सायन्स काँग्रेसचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. सभा आयोजना बाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंचाचे कार्यकर्ते किरण काळे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, दीपक ससाणे, इंजि. सुजित क्षेत्रे, देवराम शिंदे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला आदींनी दिली आहे. संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, अॅड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी हे राज्यभर सभा घेत असून तेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे वागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिले. सामाजिक कार्यकर्त्या निशाताई शिवूरकर (संगमनेर) देखील सभेला संबोधित करणार आहेत.
देशात आणि राज्यात हुकुमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे. निवडणूक आयोग, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या स्वायत्त संस्थांचा राजकीय हेतूने गैरवापर सुरू आहे. बेरोजगारी, महागाई, धार्मिक, जातीय तेढ यामुळे जनता त्रस्त आहे. हुकुमशाहीला विरोध आणि लोकशाही वाचविण्यासाठीचा लढा जन सहभागाने पुढे नेण्यासाठी सभा आयोजित करण्यात आल्याचे मंचाने म्हटले आहे. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, पत्रकार, उद्योजक, व्यापारी, साहित्य, कला, संगीत, कामगार, कष्टकरी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध घटकातील नगरकर सभेला उपस्थित असणार आहेत.