तपास संथगतीने, बाबाला अभय की निष्काळजीपणा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू गडगे महाराज याच्या आश्रमवर ‘अंनिस’च्या तक्रारीनंतर कारवाई करीत राजेंद्र गडगेसह मधुकर शिंदे या दोघांना पोलिसांनी अटक केली, मात्र डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे व सुरेश शिंदे हे अन्य तिघे अद्याप पसारचं आहेत. तब्बल पाच दिवसानंतरही पोलिसांना या तिघांचा कुठलाच थांगपत्ता लागला नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा तपास ज्या संथगतीने सुरू आहे ते पहाता या बाबाला अभय दिले जात आहे की नेहमीसारखा तपासात निष्काळजीपणा केला जात आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

नाशिकच्या खरात प्रकरणानंतर सध्या भोंदू गडगे महाराज प्रकरण जिल्ह्यासह राज्यात गाजत आहे. याबाबत दररोज नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. वीज चोरीप्रकरणी वीज वितरण कंपनीने भोंदू गडगेच्या आश्रमला नोटीस पाठवून पावणेदोन लाखांचा दंड ठोठावला आहे. यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशानुसार लवकरच या भोंदूवर पीसीपीएनडीटी नुसार आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. बाबाचे एक एक प्रताप समोर येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी गडगेविरुद्ध झालेल्या कारवाईचे स्वागत केले आहे.

फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करीत असली तरी, तिला मर्यादा येतात. पोलिसांनी यामध्ये पुढाकार घेणे गरजेचे आहे. दरम्यान आश्रम सील करण्यात आला आहे. तेथील वेगवेगळे साहित्य जप्त करण्यात आले, मात्र अद्याप पोलिसांनी खोलवर तपास केलेला दिसत नाही. अशातच गडगे याचे सहकारी डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे व सूरज शिंदे हे तिघे जण पसारचं आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत, मात्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत या तिघांचा कुठलाही थांगपत्ता पोलिसांना लागला नव्हता. पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे स्वतः तपास करीत आहे.
पाच दिवस उलटले तरी, पोलिसांना तिघांपैकी एकालाही पकडण्यात यश आले नाही. सदर तपासात तांत्रिक अडचणी आहेत की नेहमीसारखा निष्काळजीपणा केला जात आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र त्याचा फायदा या भोंदू गडगेला होताना दिसत आहे.





















