
नाशिक विभागातील सर्वात मोठी कारवाई
युवावार्ता (प्रतिनिधी)
नगर – शे-पन्नास रुपयांची लाचखोरी आता तब्बल कोटीच्या घरात गेली आहे. एमआयसीसी अधिकार्याने तर लाचेत विक्रमच केला आहे. अहमदनगर येथील सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड (वय 32, रा. प्लॉट नंबर 2, आनंदविहार, नागापूर, अहमदनगर मूळ रा. चिंचोली ता. राहुरी) याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने रंगेहात पकडले आहे.
गायकवाड याने लाचेची रक्कम स्वतःसाठी व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्यासाठी स्वीकारली असल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी केलेल्या या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. नाशिक विभागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एका शासकीय ठेकेदाराने अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळा अंतर्गत 100 एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे, यासाठी सदर बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता या बिलाच्या कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिसी म्हणुन एक कोटी रूपये
लाचेची मागणी केली होती. त्यामुळे या ठेकेदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर एसीबीच्या नाशिक पथकाने शुक्रवारी दुपारी नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिल्डिंगच्या बाजुला सापळा लावला होता.

संबंधित ठेकेदाराकडून लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्विकारली. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिस्स्याची 50 टक्के कोठे पोहचवावी बाबत विचारले असता वाघ याने सांगीतले की, ’राहु दे तुझ्याकडे, बोलतो मी ’तुला. ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सांगतो नंतर, सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवुन दे’, असे म्हणुन वाघ याने गायकवाड याला सांगितले. या दरम्यान पथकाने गायकवाड याला लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले. गायकवाड आणि वाघ या दोघांविरुद्ध नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल एक कोटी रुपयांची लाचखोरी समोर आल्याने नगर जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे याचे हे एक ज्वलंत उदाहरण ठरले आहे
