संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील घटना
शेतकर्याचे हजाराेंचे नुकसान
युवावार्ता (प्रतिनिधी)-
संगमनेर – तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथील रईस अंबीर शेख या पशुपालकाच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने आठ शेळ्या जागीच ठार केल्याची घटना रविवार दि. 7 एप्रिलला पहाटे घडली आहे. यामध्ये शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
आंबीखालसा परिसरातील गणपीरदरा येथे रईस शेख यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या शेडमध्ये बंद केल्या होत्या. रविवारी पहाटे बिबट्याने जाळीवरून उडी मारून थेट आत प्रवेश करून आठ शेळ्या जागीच ठार केल्या असून दोन शेळ्या बिबट्या घेऊन गेला असल्याचे शेख यांनी सांगितले. दरम्यान शेख हे पहाटे चार वाजेच्या सुमारास झोपेतून उठले होते. त्यांनी शेडकडे जाऊन पाहिले असता समोर शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. सकाळी घटनेची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच भाग एकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, योगीता पवार, ज्ञानेश्वर कोरडे यांच्यासह वन कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृत शेळ्यांचा पंचनामा केला. या घटनेमुळे पशुपालक शेख यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान परिसरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही बिबट्याने अनेक छोट्या-मोठ्या जनावरांवर हल्ले केले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.