संगमनेर फेस्टिव्हलमधून मिळणार सांस्कृतिक मेजवाणी

राजस्थान युवक मंडळ; छत्रपतींच्या ‘दक्षिण दिग्विजय’ शौर्यगाथेने होणार शुभारंभ


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेला संगमनेर फेस्टिव्हल यंदा पंधरा वर्ष पूर्ण करीत आहे. यंदाही श्री स्थापनेच्या दुसर्‍या दिवसापासून सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पेशाने संगणक अभियंता असलेल्या दोघा तरुणांच्या ‘गोष्ट इथे संपत नाही..’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयावरील शौर्यगाथेने फेस्टिव्हलचा शुभारंभ होणार आहे. पाच दिवसांच्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये राज्यस्तरीय समूह नृत्यस्पर्धेसह अभिनेता भरत जाधव आणि निवेदिता सराफ यांच्या धम्माल मराठी नाट्यप्रयोगांचेही सादरीकरण होणार आहे. यासर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश खुला असल्याची माहिती संगमनेर फेस्टिव्हलचे जनक, राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी दिली.


गेल्या पंधरा वर्षांपासून संगमनेरचा गणेशोत्सव म्हणजे ‘संगमनेर फेस्टिव्हल’ असे समीकरण घट्ट झाले आहे. दरवर्षी सादर होणार्‍या वीरगाथा, शौर्यगाथा, गायन, नृत्य, नाट्यप्रयोग, व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, कवी संमेलन, लोककला अशा बहुरंगी सांस्कृतिक वैभवाने फेस्टिव्हलचा रंगमंच समृद्ध झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील पाच दिवस अशाच दिमाखदार कार्यक्रमांची मेजवाणी संगमनेरकरांना मिळणार आहे.
बुधवार 20 सप्टेंबररोजी संगमनेर फेस्टिव्हलचा शुभारंभ होईल. सायंकाळी सहा वाजता पारंपरिक पद्धतीच्या सोहळ्यानंतर पेशाने संगणक अभियंता असलेल्या सारंग मांडके आणि सारंग भोईरकर या तरुण जोडगोळीच्या अफलातून कल्पनेतून साकारलेल्या ‘गोष्ट इथे संपत नाही’ या छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेवरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपतींचा दूरदर्शी स्वभाव आणि दक्षिणी पातशाही रक्षिण्याचा मुरब्बी डाव म्हणून महाराजांच्या दक्षिणस्वारीकडे बघितले जाते. म्हणूनच या स्वारीला इतिहास ‘दक्षिण दिग्विजय’ म्हणून ओळखतो. या मोहिमेतील रंजक, थरारक युद्ध कथांसह राजांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेचे दर्शन हे दोघे घडवणार आहेत.
गुरुवार 21 सप्टेंबररोजी सायंकाळी 7 वाजता हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गीतांची सुरेल मैफील रंगणार आहे. झी स्टार, सोनी अशा राष्ट्रीय मनोरंजन वाहिन्यांवरील स्पर्धांमध्ये गाजलेल्या बाराहून अधिक संगितवृंदांचा समावेश असलेला ‘बेस्ट ऑफ बॉलिवूड लाईव्ह’ हा कार्यक्रम होणार आहे. शालेय व महाविद्यालयीन कलाकारांना हक्काचा रंगमंच उपलब्ध करुन देणार्‍या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये यंदाही ‘डान्सींग सुपरस्टार’ ही राज्यस्तरीय समूह नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार 22 सप्टेंबर रोजी दोन गटात होणार्‍या या स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. चित्रपट क्षेत्रातील विख्यात नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे प्रमुख परिक्षक आहे.
शनिवार 23 सप्टेबर रोजी सायंकाळी 7 वाजता विनोदी अभिनेता भरत जाधव यांच्या चौदा भूमिकांचा नवा कोरा कल्ला असलेल्या ‘तूतूमीमी’ या भन्नाट विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा जाधव आणि ऐश्वर्या शिंदे यांच्याही या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप रविवार 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी स्वरा आणि ते दोघं’ या कौटुंबिक नाटकाने होणार आहे. आज झपाट्याने स्वीकारल्या जाणार्‍या ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’ संस्कृतीवर प्रकाश टाकून मानवी भावभावनांना उलगडणार्‍या या नाट्यप्रयोगात सुयश टिळक, रश्मी अनपट व श्रीरंग देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड या ठिकाणी दिनांक 20 ते 24 सप्टेंबर अशा गणेशोत्सवातील पाच दिवस दररोज संगमनेरकरांना दिमाखदार सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवाणी मिळणार आहे. संगमनेर फेस्टिव्हलमधील सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थान युवक मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख