क्रूरकर्मा अण्णा वैद्यचा खूनही क्रूरपणे

0
1388

अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याने जमावाच्या हल्ल्यात अण्णा ठार

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले –
चार महिलांचा निर्घृणपणे खून करून त्यांचे सांगाडे आपल्याच शेतात पुरणार्‍या व अनेक वर्षे जेलची हवा खाणार्‍या क्रूरकर्मा अण्णा वैद्य याचा मृत्यू देखील क्रुरपणे झाला आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तीला मारहाण करणार्‍या या अण्णा वैद्यची गावकर्‍यांनी ठेचून हत्या केली. या प्रकरणाने अण्णा वेद्यच्या गुन्ह्यांना उजाळा मिळाला आहे. तर या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून नियतीनेच वैद्यला न्याय दिला आहे अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. रविवारी (दि. 10 डिसेंबर) सायंकाळी अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे ही घटना घडली.


चार महिलांच्या खून प्रकरणानंतर क्रूरकर्मा म्हणून राज्यात परिचित असलेल्या मच्छिंद्र उर्फ अण्णासाहेब मुक्ताजी वैद्य (अण्णा वैद्य) याने रविवारी सायंकाळी सुगाव खुर्द गावातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत तीचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला घरात जाऊन बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत घाबरलेली मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याच्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली. अनेक महिलांचा बळी घेणारा व सध्या सुगावमध्ये स्थायिक असलेल्या अण्णा वैद्याच्या दहशतीला सर्वच घाबरत होते. यावेळी ग्रामस्थांच्या संयमाचा पारा चढला. आणि ग्रामस्थांनी मागचा पुढचा राग काढत अण्णाची जोरदार धुलाई केली. मात्र यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अकोले पोलिसांनी वैद्य याला उपचारासाठी सुरुवातीला अकोले व नंतर संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री 9 वा. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.


दरम्यान एका केबल चोरी प्रकरणात गावकर्‍यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्या शेतात घेतलेल्या शोध मोहिमेमध्ये चार महिलांचे सांगाडे सापडल्यानंतर हे साखळी खून प्रकरण उघडकीस आले होते. वैद्य याने या चार महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह आपल्या शेतात पुरून ठेवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. चार महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह शेतात पुरून ठेवल्याच्या आरोपावरून वैद्य याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. वैद्य याला एका महिलेच्या खून प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा उच्च न्यायालयात रद्द करण्यात आली होती. दुसर्‍या एका खून प्रकरणात न्यायालयाने त्याचे निर्दोष मुक्तता केली होती. तिसर्‍या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावले तर अन्य एक खून खटला न्यायालयात प्रलंबित आहे. शिक्षा भोगून आल्यानंतर वैद्य आपल्या गावी सुगाव खुर्द येथे राहत होता. मात्र त्याची दहशत कायम होती.

अखेर अण्णाची दहशत संपली, जामावावर दाखल होणार गुन्हा

क्रुरकर्मा अण्णा वैद्य हा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याची गावात प्रंचड दहशत होती. त्याच्याशी कोणी फार बोलत नव्हते. तसेच व्यवहारही करत नव्हते. किरकोळ गोष्टीवरून तो वाद घालत होता. त्यामुळे ग्रामस्थ त्याच्यापासून चार हात दुरच राहत होते.मात्र काल घडलेल्या प्रकारानंतर काही नागरीकांचा संयम संपला आणि त्यांनी अण्णा वैद्यची हत्या करत त्याची दहशत कायमची संपविली. दरम्यान पोलीसांनी महिला खून प्रकरणाचा खोलवर तपास न केल्याने, सबळ साक्षी पुरावे गोळा न केल्याने अण्णा जेल बाहेर आला. मात्र नियतीनेच त्याला शिक्षा दिली. दरम्यान या प्रकरणी अण्णा वैद्यची हत्या करणार्‍या जमावावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया अकोले तालुका पोलीस ठाण्यात सुरू आहे.

सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी अण्णासोबत घालविलेल्या एका दिवसाची आठवण
बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी म्हणून मी 26 जानेवारी 2007 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.उमाकांत दांगट यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले होते आणि ते मी लेखी स्वरूपात मागत होतो.
त्यावरून माजी मग्रूर पोलीस निरीक्षक रमेश आठवले याने त्यावेळच्या वजनदार पंचायत समिती सभापती कडून पैसे घेऊन मला प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली अटक केली होती.
त्यावेळी रात्रभर मी गुन्हेगार अण्णा वैद्य याच्या बराकीत होतो.
तो तासनतास ध्यानधारणा करायचा,नगरपालिका ग्रंथालयातली बरीचं पुस्तके त्याने वाचून काढली होती.
त्याच्या नावाची एवढी दहशत होती की,त्याच्याशी बोलण्याचा कोणीही प्रयत्न करत नसायचे.
त्या रात्री त्या बराकीतली अवस्था बघून यावर कारवाई केली पाहिजे अशी चर्चा सुरु होती त्यावेळी तो फक्त बघ्याच्या भूमिकेत असायचा नंतर त्याने त्यावर सगळ्या बराकीतल्या आरोपींच्या सहीचे एक निवेदनचं काही आमदारांना पाठवले होते.
( हे नंतर त्याने तत्कालीन महसूल अधिकारी यांच्याकडे मान्य केले होते )
त्या निवेदनाच्या आधारे नंतर अधिवेशनात तारांकित प्रश्‍न विचारला गेला त्यातून जेल मध्ये सुधारणाही झाली.
त्याला कोणत्या व्यक्तीशी कसे वागायचे हे बरोबर माहिती होते,तो पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करायचा आणि अधिकारी यांना मी खुप घाबरलोय असे दाखवायचा आणि त्यातून सहानुभूती मिळवायचा.
गेल्याचं आठवड्यात नागपूरात श्री.संजय पाटील ( या प्रकरणाचे तपासाधिकारी असणारे तत्कालीन डी वाय एस पी व सध्याचे सह पोलीस आयुक्त,नागपूर ) यांची भेट झाली तेव्हाही अण्णा वैद्य प्रकरणाची चर्चा झाली होती.
एका क्रूर गुन्हेगाराचा शेवटही त्याच्या चुकीच्या वागण्यामुळेचं झाला.
त्याच्या चुकीच्या कर्माची परतफेड त्याला इथेच करावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here