बाळ हिरड्याच्या रास्त दरासाठी आदिवासींचे धरणे आंदोलन

0
1661

हजारोंच्या संख्येने सामील होऊन शेतकरी श्रमिक एकजूट मजबूत करा – किसान सभा

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले –
बाळ हिरड्याची रास्त भावाने सरकारी खरेदी सुरु करावी या मागणीसाठी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांच्या कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभा व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कॉ. डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. सोमवार दिनांक 9-10-2023 दुपारी 12.00 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व नाशिक जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकर्‍यांचे हिरडा हे एक महत्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. आदिवासी शेतकरी जीवावर उदार होऊन हिरडा गोळा करतात. सरकारच्या वतीने जेंव्हा हिरडा खरेदी होतो तेंव्हा स्पर्धा वाढून शेतकर्‍यांना थोडा बरा भाव मिळतो. मात्र जेंव्हा हिरड्याची सरकारी खरेदी होत नाही तेंव्हा खाजगी व्यापारी संगनमत करून हिरड्याचे भाव पाडतात आणि आदिवासी शेतकर्‍यांची लुट करतात. किसान सभेने या पार्श्वभूमीवर हिरड्याला रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने हिरड्याची खरेदी करावी हि मागणी सातत्याने उचलून धरली आहे.


दिंडोरी ते वाशिंद लाँगमार्च मध्ये तसेच अकोले ते लोणी लाँगमार्चमध्ये किसान सभेने याबाबतची मागणी आक्रमकपणे उचलून धरली. परिणामी दिनांक 9 मे 2023 रोजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांना या प्रश्नाबाबत मंत्रालयस्तरावर बैठक घ्यावी लागली. किसान सभेच्या शिष्टमंडळाने या बैठकीत केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सरकारला बाळ हिरड्याची सरकारी खरेदी करण्याचे आश्वासन द्यावे लागले. मात्र आता पाच महिने होत आले तरी अद्यापही सरकारने याबाबत पुढील कार्यवाही केलेली नाही. किसान सभेने या पार्श्वभूमीवर पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
वरील मागण्यांसाठी नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर होत असलेल्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील होऊन शेतकरी श्रमिक एकजूट मजबूत करा. असे आवाहन किसान सभेचे डॉ. अजित नवले, डॉ. अमोल वाघमारे, नामदेव भांगरे, विश्वनाथ निगळे, एकनाथ मेंगाळ, सदाशिव साबळे, अशोक गिर्‍हे, माधुरी कोरडे, ज्ञानेश्वर काकड, राजू गंभीरे, प्रकाश साबळे, तुळशीराम कातोरे यांनी केले आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here