बाळासाहेब गुंडाजी घोडे ठरले या पुरस्काराचे पहिले मानकरी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- ज्यांनी आपली उभी हयात फक्त विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षक यांच्यासाठीच खर्च केले. असे आदर्श शिक्षक सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी म्हणजे मुलांमध्ये देव पाहणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नावे उत्कृष्ट काम करणार्या शिक्षकास दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात यावा असा मानस व्यक्त करताच कळसकर गुरुजींनी आपल्या जमा पुंजीतून दहा लाख रुपयाची रक्कम त्यासाठी बाजूला ठेवून त्यातून येणार्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात यावा असे जाहीर केले. कळसकर गुरुजी त्यांचे पुतणे रामनाथ कळसकर व शाळीग्राम होडगर यांनी स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रबोधन संस्थेमार्फत हा पुरस्कार प्रदान करण्याचे मान्य केले. याच संस्थेमार्फत गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी कळसकर गुरुजींनी चालू केलेले सौ. नलिनी सोमनाथ कळसकर विद्यालय चालवण्यात येते.
वर्तमानपत्रातून व समाज माध्यमातून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून अनेक शिक्षकांनी आपले प्रस्ताव संस्थेकडे पाठवले आहेत. पुरस्कार निवड समितीने सर्व प्रस्तावांची छाननी करून त्यातून काही दर्जेदार प्रस्ताव निवडले आहे. आलेल्या प्रस्तावांमधून एक आगळा वेगळा प्रस्ताव निवडणे तसे जिकिरीचे काम होते. अनेक नावे समोर आली परंतु ध्येयाने प्रेरित होऊन भटक्या विमुक्तांच्या गावांमध्ये काम करून आपला व आपल्या शाळेचा वेगळा ठसा उमठविणार्या एका शिक्षकाच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. त्यानूसार बाळासाहेब गुंडाजी घोडे हे शिक्षक या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहे. रविवार 29 ऑक्टोबर रोजी सो. ता. कळसकर गुरुजींच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुजींचे अभिष्टचिंतन व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुणवंत शिक्षक म्हणून प्रदीप भाऊसाहेब काकड व प्रयोगशील शिक्षक म्हणून सुनील गणपत ढेरंगे आणि श्रीमती स्वाती निवृत्ती बेणके यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.