अर्धवट कामाने घेतला तरुणाचा बळी

पत्नी गंभीर जखमी, अकोलेत घडली घटना

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले- अकोले नगरपंचायतीच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी हे विकासकामे अर्धवट अवस्थेत ठेवल्याने ते नागरीकांच्या जीवावर उठले आहे. दरम्यान काल सोमवारी रात्री शहरातील एका चौकात रस्त्याच्या अर्धवट कामामुळे निर्माण झालेल्या कपारीवरुन दुचाकी घसरुन अपघात झाला. तर याचवेळी पाठीमागून आलेल्या ढंपरखाली चिरडले गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असणारी त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये नगरपंचायत व ठेकेदारांच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.


हेमंत मधुकर अस्वले रा. वीरगाव ता. अकोले असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नी राणी हेमंत अस्वले ही गंभीर जखमी आहेत. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी की, मयत हेमंत अस्वले व त्याची पत्नी राणी हे दोघे काल शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. सायंकाळी देवदर्शन आटवून हे दोघेजण परतीच्या प्रवासाला असताना अकोले शहरातील कराळे किराणा दुकानासमोर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कपारीमुळे घसरून खाली पडली. दरम्यान याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरचा डंपरखाली सापडून हेमंत अस्वले हे गंभीर जखमी झाले. तर त्यांची पत्नी राणीलाई गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर या दोघांनाही शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच हेमंत अस्वले यांचा मृत्यू झाला. दरम्यान अकोले शहरातील कराळे किराणा दुकानासमोर गटारीचे व रस्त्याचे काम अगदी संथ गतीने सुरू आहे. त्यातच रस्ता करताना त्याला मोठी कपार ठेवण्यात आली आहे. तर वाहन चालकांना इशारा म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुचना फलक अथवा अटकाव करण्यात आलेला नाही. त्यामुळेच हेमंत अस्वले यांना या रस्त्याचा अंदाज आला नाही आणि हा भीषण अपघात घडला. या अपघाताला सर्वस्वी अकोले नगरपंचायत व संबंधित ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


दरम्यान मयत हेमंत अस्वले हे युवा नेतृत्व होते. त्यांच्या अपघाती निधनाने वीरगाव, अकोले, संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. आज मंगळवारी सकाळी वीरगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत. अकोले शहरात रस्त्यांची दुरावस्था व अतिक्रमण हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. नगरपंचायत होऊनही कारभारात फारसा फरक पडला नाही. त्यातच असे अपघात वारंवार घडत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख