युवावाार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – जंगलात मानवी हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या वाढत्या हस्तक्षेपामुळे देशात एक हजारांवर प्राणी प्रजाती व 20 हजारांपेक्षा जास्त सपुष्प वनस्पती संकटात आले आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) च्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. तर संगमनेर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र असून पाणी व शिकारीच्या शोधात मानवी वस्तीकडे येणारे अनेक बिबटे अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. तर आता काही जण या बिबट्यांच्या अवयवांची तस्करी करु लागल्याने तालुक्यातील बिबट्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
जैविक संसाधनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रसंघाने 2000 पासून आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्याचे ठरविले. जगाच्या 2.4 टक्के भूभाग व्यापलेल्या आपल्या देशात 7 ते 8 टक्के प्राणी वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यात 91 हजार प्राणी-प्रजाती व 45 हजार 500 वनस्पती प्रजातींचा समावेश आहे. एखादी प्रजात नष्ट झाली तर तीचे पुनरुज्जीवन करणे अवघड असते.
वाढत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्या, साबडे, अस्वल, भारतीय हत्ती, आशियाई सिंह, भारतीय गेंडा, बंगाली वाघ व भारतीय गिधाडे अशा काही प्राणी- पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण यासाठी होणारी जंगलतोड यामुळे जंगलातील प्राणी आपल्या अस्तित्वासाठी आता शहराकडे धाव घेत आहे. परंतु त्यामुळे मानवी अस्तित्व धोक्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक भागातून आता हे बिबटे शहराकडे येऊ लागले आहेत. परंतु तालुक्यातून जाणार्या नाशिक- पुणे महामार्गावर व इतरही अनेक मोठ्या मार्गावर या प्राण्यांसाठी रस्ता ओलडण्याची सोय नसल्याने रात्रीच्यावेळी रस्ता ओलांडतांना हे प्राणी अपघातात मृत्यूमुखी पडतात. यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तालुक्यात शुक्रवारी देखील हिवरगाव पावसा फाटा या ठिकाणी एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला. असे अनेक बिबटे आजपर्यंत अशा अपघातात बळी गेले आहे.
दरम्यान शहराकडे येणार्या बिबट्यांना पाणी व शिकार मिळत नसल्याने कधी कधी उपाशी पोटी व आजारपणातही त्यांचा बळी जात आहे. तर दुसरीकडे बिबट्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी नुकतीच चुंदनापुरी परीसरात वनविभाने जेरबंद केली आहे. अशा प्रकारे जर टोळ्या अधिक सक्रिय झाल्यास व शासनाने त्यावर प्रतिबंध न घातल्यास तालुक्यातून बिबट्यांचे अस्तित्व नष्ट होण्यास फारसा वेळ लागणार नाही.
बिबटे हे हिंस्त्र प्राणी असले तरी मानवाने त्यांच्या भुमिवर अतिक्रमण केल्याने त्यांना नाईलजस्तव मानवी वस्तीत शिरकाव करावा लागत आहे. देश पातळीवर चित्ता, सिंह, वाघ यांची जनगणना होऊन त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची मोहीम सरू असतांना संगमनेरात मात्र वनविभागाचे याकडे कोणतेही लक्ष नाही.
तालुक्यात त्या मानाने वन्य प्राण्यांची संख्या कमी आहे. तसेच आपल्याकडे दुर्मिळ प्राणीही फारशे नाही. अशा परिस्थितीत बिबट्या या एकमेव प्राण्याचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे.
बेसुमार जंगलतोड, जंगलाला वनवा लागणे, जंगलात अतिक्रमण करणे, उद्योग उभारणे यावर काही निर्बंध घातल्यास नक्कीच बिबट्यांच्या संरक्षणास मदत होईल. तसेच मानवी वस्तीमधील त्यांचा प्रादुर्भावही कमी होईल. यासाठी शासन स्थरावर खास उपाययोजना करणे गरजेचे आहे.