अकोले नाका परिसरात नागरिक दहशतीत

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर (प्रतिनिधी) – शहरातील अकोले नाका परिसरात भटके कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला अनेक नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचारी विशेषतः धास्तावले आहेत. काही जणांवर सध्या उपचार सुरू असून, परिस्थिती गंभीर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, अकोले नाका परिसरात भटके कुत्रे टोळक्याने फिरताना दिसत आहेत. हे कुत्रे अचानक पायी जाणार्या नागरिकांवर तसेच दुचाकीस्वारांच्या मागे धावत हल्ला करतात. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना बाहेर पडताना भीती वाटत आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेने भटके कुत्रे आणि मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम काही दिवसांतच अर्धवट थांबवण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, शहरातील विविध भागांत पुन्हा एकदा भटक्या प्राण्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.
या समस्येमुळे अपघातांचाही धोका वाढला आहे. कुत्रे अचानक रस्त्यावर धावत आल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच, कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागावरही ताण वाढण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी नगरपालिकेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून, भटके कुत्रे पकडण्याची मोहीम पुन्हा प्रभावीपणे राबवावी, निर्बंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि परिसरात लसीकरण मोहीमही हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.





















