संगमनेर नगरपालिकेची थकीत कर भरणाऱ्यांसाठी मोठी संधी

0
6

‘अभय योजना’ लागू; ३१ मार्चपर्यंत लाभ

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेने शहरातील थकबाकीदार नागरिकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार नगरपालिकेने ’अभय योजना’ लागू केली असून, मे 2025 पर्यंतची घरपट्टीची थकबाकी असणार्‍या नागरिकांना दंडात्मक व्याजात 50% सवलत दिली जाणार आहे. तसेच 31 मार्च पर्यंत दहा कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या दालनातील मीटिंग हॉल मध्ये मुख्याधिकारी श्री. गोरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कर अधिकारी श्वेता शिंदे, सहायक कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ व आरोग्य निरीक्षक अमजद पठाण उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्याधिकारी श्री. गोरे म्हणाले की, अभय योजना फक्त 31 मार्चपर्यंत लागू असेल. त्यानंतर ही सवलत मिळणार नाही. शासनाच्या नियमानुसार, चालू मागणी आणि थकबाकीवर प्रति महिना 2% म्हणजेच वर्षाला 24% व्याज आकारले जाते. कायद्यातील तरतुदीनुसार या व्याज आकारणीत नगरपालिका स्वतःहून कोणताही बदल किंवा ठराव करून कपात करू शकत नाही. ज्या नागरिकांनी अद्याप आपला कर भरलेला नाही, त्यांच्यावर पालिकेतर्फे कडक पावले उचलली जात आहेत.
शहरात सध्या नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे. थकबाकी असलेल्या व्यावसायिक गाळ्यांना आणि मालमत्तांना सील ठोकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिनांक 20 मार्च 2026 नंतर मोठ्या थकबाकीदारांची नावे प्रभागनिहाय वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर आणि संबंधित ठिकाणी फ्लेक्स लावून प्रसिद्ध केली जाणार आहेत.

यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणारे आणि काही भागात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणार्‍यांची यादी असेल. त्याचबरोबर दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत नगरपालिकेचे 10 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 4 कोटी 80 लाख रुपये वसुली झाली असून कमीत कमी 7 कोटी पर्यंत वसुली होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांसाठी आणि सोयीसुविधांसाठी नागरिकांनी आपला कर वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.
नागरी सुविधा देण्यासाठी नगरपालिका कटीबद्ध आहे. परंतू त्याचबरोबर नागरीकांनी देखील आपल्या कराची थकबाकी वेळेआधी भरणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here