१ मार्च २०२६ पासून कडक अंमलबजावणी; नागरिकांना ‘भागीदार’ होण्याचे आवाहन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ‘संगमनेर 2.0 – खीं’ी ढळाश ढे णसिीरवश!’ ही व्यापक मोहीम हाती घेतली असून दि. 1 मार्च 2026 पासून शहरात नव्या कडक परंतु शिस्तीच्या नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
शहर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक संगमनेरकराची नैतिक जबाबदारी आहे, असा ठाम संदेश देत नागरिकांना ‘भागीदार’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे, उपनगराध्यक्ष नुरमोहम्मद पिरमोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद दादासाहेब गोरे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त – शहरातील रस्ते व फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दुकानदारांनी दुकानासमोरील वाढीव ओटे, शेड, अनधिकृत फलक त्वरित काढून टाकावेत.
दुकानाबाहेर माल ठेवण्यास मनाई – वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास नगरपालिका स्वतः तोडकाम करून खर्च संबंधित मालकाकडून वसूल करेल.
जाहिरातबाजीला शिस्त- पूर्वपरवानगीशिवाय बॅनर, पोस्टर्स, फ्लेक्स, झेंडे, कमानी लावण्यास सक्त मनाई. नियमबाह्य जाहिरातींवर तात्काळ कारवाई.परवानगीप्राप्त ठिकाणीच जाहिरात फलक लावण्याची मुभा.

प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, काही नियम तात्काळ कठीण वाटू शकतात; मात्र ते शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहेत. संगमनेर सुंदर, स्वच्छ आणि आदर्श बनविण्याची ताकद आपल्या प्रत्येकाच्या सहभागात आहे. चला, नियम पाळूया आणि संगमनेरला महाराष्ट्रातील आदर्श शहर बनवूया, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे.1 मार्च 2026 पासून अंमलबजावणी होणार्या या मोहिमेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, ‘संगमनेर 2.0’ ही मोहीम शहराच्या विकासातील नवे पर्व ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कचरा व्यवस्थापन सक्तीचे- शहर स्वच्छतेसाठी ‘ओला’ व ‘सुका’ कचरा वेगळा करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्लास्टिक, कागद, बाटल्या सुक्या कचर्यातच द्याव्यात. मिश्र कचरा स्वीकारला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास भरारी पथकाकडून जागेवर दंड.
मोकळे भूखंड स्वच्छ ठेवणे बंधनकारक- खाजगी प्लॉट मालकांनी जागा स्वच्छ ठेवून कुंपण घालणे आवश्यक. कचरा, ज्वलनशील वस्तू किंवा डासांची उत्पत्ती होईल असे साठे ठेवण्यास बंदी. सूचना देऊनही स्वच्छता न केल्यास नगरपालिका स्वच्छता करून खर्च व दंड ‘मालमत्ता करात’ समाविष्ट करेल.
पार्किंग आणि वाहतूक शिस्त – हॉस्पिटल, बँका व मोठ्या आस्थापनांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे बंधनकारक. सर्व वाहने नियुक्त पार्किंग झोनमध्येच उभी करावीत. चौकात किंवा रस्त्यावर अव्यवस्थित पार्किंग केल्यास कायदेशीर कारवाई.
बांधकामासाठी पूर्वपरवानगी आवश्यक- कोणतेही बांधकाम नगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. मंजूर नकाशानुसारच बांधकाम करणे आवश्यक. विनापरवाना बांधकामांवर कठोर कारवाई.
सार्वजनिक कार्यक्रमांवर नियंत्रण -मिरवणुका, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी बंधनकारक. अपवादात्मक परिस्थितीतच परवानगी. नियमांचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमांवर बंदी.
पथविक्रेत्यांसाठी नवे नियम- रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी अधिकृत परवाना आवश्यक. विनापरवाना व्यवसाय करणार्यांवर कायदेशीर कारवाई. दंड न भरल्यास थेट ‘मालमत्ता करात’ समावेश नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. आकारलेला दंड न भरल्यास तो संबंधितांच्या मालमत्ता करात समाविष्ट केला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.





















