पद धोक्यात येण्याची दाट शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्या गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ यांनी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले अपील फेटाळून अहिल्यानगर जिल्हाधिकार्यांना फेरचौकशीचे आदेश दिले आहेत.
संगमनेर शहरालगत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गुंजाळवाडी ओळखली जाते. या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन 2023- 24 मध्ये पार पडली होती, निवडणुकीनंतर अमोल संभाजी गुंजाळ हे जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच गुंजाळ यांनी गावठाणामध्ये अतिक्रमण केले तसेच नामनिर्देशन अर्ज दाखल करतेवेळी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयामध्ये शिपाई या पदावर कर्मचारी असल्याने संस्थेचा व सक्षम अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडले नाही अशी तक्रार पंढरीनाथ लक्ष्मण गुंजाळ यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे 4/2024 नंबरने अपील दाखल केले होते.

जिल्हाधिकार्यांनी सरपंच अमोल गुंजाळ यांच्या बाजूने निर्णय दिला होता आणि तक्रारदार पंढरीनाथ गुंजाळ यांचे अपील फेटाळून लावले होते. त्यानंतर तक्रारदार पंढरीनाथ गुंजाळ यांनी नाराज होऊन जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाच्या विरोधात नाशिक अप्पर विभागीय आयुक्तांकडे अपील नंबर 38/ 2025 दाखल केले होते. अप्पर विभागीय आयुक्तांनी तक्रारदार पंढरीनाथ गुंजाळ यांचे अपील अंशतः मान्य करून जिल्हाधिकार्यांनी दिलेला निर्णय विवाद अर्ज 4/2024 20 जानेवारी, 2025 रोजीचा जिल्हाधिकारी यांनी पारित केलेला आदेश रद्द करण्यात आला आणि या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले.

त्यावर सरपंच अमोल गुंजाळ यांनी नाराज होऊन नाशिक अप्पर विभागीय आयुक्त यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यासाठी अपील रिट पिटशन 14451 / 2025 या नंबरने अपील दाखल केले होते. या अपीलावर 14 जानेवारी 2026 रोजी न्यायाधीश एस. जी. चपळगावकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पंढरीनाथ गुंजाळ यांच्यावतीने ऍड.. सुवर्णा झावरे यांनी व सरपंच अमोल गुंजाळ यांच्यावतीने ऍड. ए. डी. सोनकवडे यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायाधीश चपळगावकर यांनी नाशिक विभागीय अप्पर आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत सरपंच अमोल गुंजाळ यांचे अपील फेटाळण्यात आले आणि फेरचौकशीचे आदेश दिले.






















