संगमनेर खुर्द परिसरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

0
1

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आमदारांची भेट, कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर खुर्द येथील वैदूवाडी परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत तरुणाचे नाव सुरज सूर्यभान शिंदे (वय 30, रा. वैदुवाडी संगमनेर खुर्द, ) असे आहे. गुरुवारी रात्री कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेलेल्या सुरजवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

घटनेनंतर गंभीर अवस्थेत सुरजला उपचारासाठी एसएमबिटी इगतपुरी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सुरजच्या डोक्याला जबर मार लागलेला असून हात, पायाला गंभीर जखमा आहेत तसेच बरगड्याही मोडलेल्या आहेत. या जखमा पाहता हा साधा अपघात नसून नियोजित हल्ला असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. दरम्यान वैदूवाडी परिसरात रात्रीच ही घटना घडल्याने आ. अमोल खताळ शासकीय विश्रामगृह येथे असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी जमा झाले होते. कुटुंबीयांनी आमदार खताळ यांची भेट घेऊन हा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याची माहिती दिली.


याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपघात म्हणून नोंद केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दुसरा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी कुटुंबीयांना स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here