संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयास मंजुरी

0
2

कामगार संघटना पदधिकाऱ्यांनी मानले आ. खताळ यांचे आभार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, आमदार अमोल खताळ यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे येथे कामगार रुग्णालयास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुलभ, परवडणारी आणि तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

औद्योगिक व इतर क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. गंभीर आजार, अपघात किंवा तातडीच्या उपचारांसाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत असल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत कामगार रुग्णालयाची मागणी लावून धरली होती.या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आता संगमनेर येथे कामगार रुग्णालय सुरू होणार असून, त्यामध्ये कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या रुग्णालयामुळे कामगारांना सुलभ, परवडणार्‍या व तातडीच्या आरोग्यसेवा मिळणार असल्याने त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे.

कामगारांच्या जीवन-मरणाशी संबंधित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल संगमनेर तालुका तंबाखू जादा कामगार संघटनेच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचे आभार मानण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष माधव नेहे, चिटणीस ज्ञानेश्वर सहाने, सदस्य बाळासाहेब पवार मुकेश काठे अर्जुन अरगडे भारत नाटे चंद्रकांत आव्हाड अजित मिसाळ यांनी आ. खताळ यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. कामगारांच्या हिता साठी पुढेही अशाच प्रकारे प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, कामगार वर्गात समाधान व्यक्त होत आहे. कामगार रुग्णालय लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा सर्वसामान्यां कडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here