लेखी आल्यानंतरच निर्णय, तोवर आंदोलन सुरूच राहणार
संगमनेर( युवावार्ता प्रतिनिधी )
दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोतुळ या ठिकाणी शेतकरी 21 दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर २६ रोजी राज्याचे दुग्ध आयुक्त विकास मोहोळ यांच्या उपस्थितीत संगमनेर प्रांत कार्यालयात आंदोलक प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा झाली.
तीन तास चाललेल्या या बैठकीसाठी राज्याच्या दुग्धविकास आयुक्तांसोबतच विभागीय दुग्ध आयुक्त श्री. शिरपूरकर, जिल्हा दुग्धविकास अधिकारी श्री. सोनूले व संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह अन्न व औषधी प्रशासन व राज्य वजन काटे मापन अधिकारी उपस्थित होते.
राज्यात सध्या 20 लाख लिटर दूध अतिरिक्त आहे. येत्या काळात फ्लश सीजन सुरू झाल्यानंतर यामध्ये आणखीन किमान दहा ते पंधरा लाख लिटर दुधाची वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज मिळत असलेला दर सुद्धा आगामी काळात मिळणार नाही अशी रास्त भीती आंदोलकांनी व्यक्त केली. सरकारने तात्पुरता इलाज म्हणून दुधाला प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान दिले आहे. मात्र हा उपाय आगामी काळात कुचकामी ठरणार असून दुधाचे उत्पादन फ्लश सीजनमध्ये अधिक वाढले, तर कंपन्या आज देत आहेत त्यापेक्षा सुद्धा आणखीन कमी दर देतील व दुधाचे भाव 22 रुपयापर्यंत खाली कोसळतील अशी भीती आंदोलकांच्या वतीने बैठकीत व्यक्त करण्यात आली. असे होऊ नये व दुधाला किमान 40 रुपये दर मिळावा यासाठी शासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी आंदोलकांच्या वतीने विचारण्यात आली.
राज्यातील वीस लाख लिटर दूध राज्याबाहेरील दूध संघांना हाताळण्यासाठी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबर दूध पावडरला अनुदान देण्यात आले आहे. दूध पावडर पोषण आहारामध्ये वितरित करण्याचेही नियोजन सरकार करत आहे असे उत्तर या पार्श्वभूमीवर देण्यात आले.
राज्यात दूध भेसळीचा प्रश्न अत्यंत गंभीर असून तातडीने याबद्दल कठोर उपाययोजना करण्याचा आग्रह आंदोलकांच्या वतीने लावून धरण्यात आला.
पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी व पशुखाद्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी धोरण घेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखान्यांची अवस्था अत्यंत वाईट असून पशुवैद्यकीय रिक्त जागांची भरती करावी, शासकीय पातळीवर औषधे उपलब्ध करून देऊन दुधाचा उत्पादन खर्च कमी करावा, आदी मागण्या ही आंदोलकांच्या वतीने यावेळी मांडण्यात आल्या.
अनुदान वाटपामध्ये अनेक दूध कंपन्यांनी 1 जुलै ते 10 जुलै या दसवड्याचे पेमेंट 30 ऐवजी 27 रुपयांनी केले आहे. याबाबत अत्यंत गांभीर्याने मुद्दे मांडण्यात आले. असे करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करू व त्यांना 30 रुपये प्रति लिटर दर द्यायला भाग पाडू असे आश्वासन यावेळी दुग्ध आयुक्त विकास मोहोळ यांनी दिले. 3.2/ 8.3 गुणवत्तेच्या आतील दुधाचा डिडक्शन दर हा अनेक संघांनी 1 रुपया केला असल्यामुळे राज्यातील 33% दुधाला यामुळे अनुदान योजना जाहीर होण्यापूर्वी होता त्यापेक्षाही कमी दर मिळत आहे ही गंभीर बाब आंदोलकांच्या वतीने आक्रमकपणाने लावून धरण्यात आले. मिल्को मिटर व वजन काटामारी बद्दलही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
याबाबत मान्य केलेल्या मागण्यांचे लेखी येत्या दोन दिवसांमध्ये प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना देण्यात येईल. लेखी आल्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असून आंदोलन तोवर सुरूच ठेवण्याचा संकल्प यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आला यावेळी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख, नामदेव साबळे, भाऊसाहेब देशमुख, प्रकाश देशमुख, अभी देशमुख, वैभव देशमुख, चेतन साबळे, दत्ता ढगे, रवींद्र पवार, शीतल हासे, सदाशिव हासे, संदीप लांडे, भारत गोरडे, नवनाथ देशमाने, निलेश तळेकर, संदीप शेणकर, महेश नवले, राहुल शेटे, नितीन नाईकवाडी, डॉ.संदीप कडलग, गौतम रोकडे आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला.