पद्मश्रींचे बेरजेचे राजकारण; आता सारा कारभार वजाबाकीचा

विखे पाटलांनी राहाता-राहुरीत जे केले, ते संगमनेरला होणार नाही…

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सत्ता आणि राजकारण यांचे नाते मायलेकराचे असते. सत्ता नावाची माता राजकारण नावाचे लेकराचे अनेक लाड पुरवीत असते. सत्तेपासून संपत्ती नावाच्या मुलीचा जन्म होतो. सत्तेपासून निर्माण होणारे राजकारण आणि संपत्ती आत्मकेंद्रित करीत असतात. राजकारण व संपत्ती सांभाळण्यासाठी सत्ता आपल्याच ताब्यात असली पाहिजे यासाठी सत्ताधीश प्रचंड अट्टाहास करीत असतात. या अट्टाहासातूनच कधी कधी मूळ संस्थाच नष्ट होतात व त्यामुळे किमान त्या ठिकाणची सत्ता संपत्ती व राजकारणही नष्ट होते. एक म्हण समाजात अतिशय प्रसिद्ध आहे. कुंकू पुसले तरी चालेल पण सवत रंडकी झालीच पाहिजे. श्रीरामपूरची मुळा -प्रवरा इलेक्ट्रिक सह. सोसा., राहुरी सह. साखर कारखाना, गणेश सह. साखर कारखाना, बाजार समिती या संस्थेमधील सत्ता व राजकारण न जमल्याने संस्था बंद पडल्या आणि राजकारण संपुष्ठात आले. आपली सत्ता नसेल, आपले राजकारण नसेल तर संस्था बंद पडल्या तरी चालतील पण इतरांचे राजकारण चालणार नाही अशी परिस्थिती विखे परिवाराने निर्माण केल्याची भावना जनतेमध्ये आहे.

आजच्या राजकारणाची घसरलेली पातळी आणि पुढार्‍याच्या तोंडातली टपोरी वक्तव्ये ऐकली की पद्मश्री बाळासाहेब विखेंची प्रकर्षाने आठवण येते. पद्मश्री बाळासाहेब विखे हे शिक्षणाने कमी परंतु संस्कारानी समृद्ध होते म्हणूनच त्यांनी टपोरी भाषा कधीच वापरली नाही. टायगर अभी जिंदा है, माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगाला हात लावला तर तेथेच गाडून टाकीन ही भाषा दिल्लीपर्यंत राजकारण केलेल्या पद्मश्री बाळासाहेब विखेंसाहेबांच्या नातवाची आहे यावर कुणी विश्‍वास ठेवणार नाही. मात्र या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ही भाषा ऐकली आहे.
शिर्डी मतदार संघात विखेंची दडपशाही आहे आणि संगमनेर मतदार संघात थोरातांची दडपशाही असल्याचे आरोप विखे -थोरातांने एकमेकांवर करीत आहेत. आपली सत्ता शाबीत ठेवण्यासाठी प्रत्येक पुढारी त्यांच्या मतदार संघात अतिशय सावध असतो. विखे – थोरातही यास अपवाद नाहीत. बाळासाहेब थोरातांनी सतत समन्वयाने व बेरजेचे राजकारण करताना विरोधकांनाही सहकार्य केले. एकवेळेस सहकार्य करता आले नाही तर टोकाचा विरोध तरी केला नाही असे थोरातांच्या कार्यकर्त्याने सांगितले. हा कार्यकर्ता पुढे असे सांगतो की आमच्या तालुक्यात कर्‍हे घाट, चंदनापुरी घाट, सोनोशी घाट, अकोले रोड, मांची घाट या डोंगरावर बाळासाहेब थोरातांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष विरोध करणार्‍या नेत्यांच्या संस्था आहेत. कारण बाळासाहेब थोरातांनी शासनात असतानाही सहकार्याची भूमिका ठेवली. या उलट सिन्नर तालुक्यातील चिंचोली घाटात, अहिल्यानगरच्या विळद घाटात विखे परिवाराने स्वतःच्या संस्था निर्माण करीत असताना संगमनेर सारख्या इतरांच्या संस्था मोठ्या होवू दिल्या नाहीत. लोणी खुर्दमधील लिटल फ्लॉवर्स स्कूल, संगमनेर रोडचे जैन होस्टेल यांना झालेला त्रास संबंधित संस्था चालकच सांगू शकतील. संगमनेर तालुक्यात किमान चार मोठे खाजगी दूध व्यवसाय यशस्वरीत्या प्रगती करीत आहेत. श्रीरामपूर सह. दूध संघ व प्रवरा सह. संस्था बंद करण्यासाठी कुणी काय काय उद्योग केले हे संबंधित संस्था चालक पुराव्यासह सांगू शकतील.

सुज्ञ नागरिकांनी परीक्षण करून ठरवावे नेमकी दडपशाही कोठे चालू आहे. प्रवरा सह. साखर कारखान्याचे गैर व्यवहारासंबंधी संबंधित कारखाना सभासदांनी होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी कोर्टाचे दार ठोठावल्याची चर्चा प्रवरा परिसरात चालू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार व राजकारणातील घराणी प्रसिद्ध आहेत. कोपरगाव, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर – नेवासा – शेवगाव, राहुरी व पारनेर या उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांच्या पहिल्या पिढीने अतिशय कुशलतेने समन्वयाने राजकारण, सहकार व सत्तास्थाने टिकवली, वाढवली. अगदी एकाच तालुक्यात आळीपाळीने सत्ता बदलत राहिल्याची उदाहरणे आहे. पहिल्या पिढीचे राजकारण, सत्तास्थाने व सहकार दुसर्‍या पिढीने वृद्धिगत केला. पहिल्या पिढीचे राज्याचे नेते यशवंतराव चव्हाण साहेब, शरदराव पवार साहेब. वसंतराव नाईक, एस. एम. जोशी, वसंतदादा पाटील यांचा विचार वारसा जोपासला. दुसर्‍या पिढीने स्वतःच्या ताब्यातील सत्ता व सहकार टिकविण्यासाठी तडजोडी केल्या, पक्षांतरे केली, प्रासंगिक गरजेपुरता विरोधही केला. सहकार, सत्ता, राजकारण जिल्ह्यात स्थिर करणार्‍या नेत्यांची तिसरी पिढी उच्च शिक्षित झाली. आजोबा -वडिलांचा वारसा पिढी परंपरेने जोपासू लागली. सत्तेचा वारसा, नवीन तंत्रज्ञान, कार्यकर्त्यांचे जाळे आणि उत्साही, अति उत्साही मित्रमंडळी बरोबर घेवून तिसरी पिढी राजकारण करू लागली. आजोबांचा वारसा सांगत असताना वडिलांना मात्र स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे, धोरणाप्रमाणे बरोबर घेत असताना सत्तेचा अहंकार, सहकाराचा वारसा व राजकारणाची उग्रता तिसर्‍या पिढीने दाखविल्यास सुरुवात केली आहे. सत्ता नावाच्या मातेला राजकारण व संपत्ती ही अपत्त्येे प्रिय असतात तसेच या सहकार व राजकारणाच्या वैभवात असणार्‍या जिल्यातील आई – वडिलांना आपली मुले चुकतात असे वाटतच नाहीत कारण ती उच्चशिक्षित लाडके भावी नेते वाटतात. त्यामुळे मुलांनी जाहीर मुक्ताफळे उधळली तरी आईवडिलांना ती गोड वाटली आणि कार्यकर्त्याना फुलासारखी वाटली तर वावगे ठरू नये.

संगमनेर-अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा, चळवळीचा, वास्तवाचा विचार करणारा असल्यामुळेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी उसाच्या मळीपासून तयार होणार्‍या मोलॅसेस पासून दारू बनविण्या ऐवजी इंडस्ट्रियल अल्कहोल तयार केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांनी सहकारी शैक्षणिक संस्थांची उभारणी करीत असताना अतिशय सुंदर व प्रशस्त परिसरात अमृतेश्‍वराचे मंदिर बांधले. साखर कारखाना परिसरातील 500 स्त्री – पुरुष व्यक्तींनी 50 वर्षाहून अधिक काळ श्री ज्ञानेश्‍वरी, श्री तुकाराम गाथा, श्रीमद्भगवतगीता या ग्रंथाची पारायणे केली आहेत. आजही ही परंपरा वृद्धिंगत होत असताना संतांचा सात्विक भाव स्वच्छ सहकाराचा प्रभाव व प्रगतीचा प्रकाश संगमनेरमध्ये स्थित आहे.
संगमनेरचे विधानसभा उमेदवार बाळासाहेब थोरातांनी सांगितलेले एकच वाक्य संगमनेरचा सहकार स्थिर ठेवील. ज्ञानेश्‍वरांचे पसायदान व भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे संविधान अंगीकारून आम्ही सर्वाना बरोबर घेवून बरेजेचे राजकारण करीत असताना राहता- राहुरीतील संस्थाप्रमाणे संगमनेरच्या संस्थांना कुणी धक्का ही लावू शकणार नाही. त्यांच्या संस्था व तालुका प्रगतीपथावर नेण्याऐवजी दुसर्‍याच्या संस्था कशा मोडकळीस निघतील यावरच जास्तवेळ खर्ची करण्यात येतो. मिळालेल्या सत्तेचा वापर हा जनसेवेसाठी होणे अपेक्षित आहे. केवळ मोठ-मोठ्याने डरकाळ्याने फोडणे, आव्हान देणे, कार्यकर्त्यांना चिथावणी देणे या ऐवजी विकासाची दिशा देणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख