राजकारणाच्या रणधुमाळीत शहरातील रस्त्यांची दुर्दशा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्यात मागील अडीच वर्षांपासून वेगवेगळे राजकीय नाट्य घडत आहे. राजकारणातील अनेक नाट्य, न्यायालयीन लढाई, दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विकास नावाचा विषय अनेकांच्या गावी राहिला नाही. अनेक वर्बांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. त्यामुळे शहरांसह गावगाड्याच्या अनेक प्रश्‍नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. यात संगमनेर शहरातील रस्त्यांची पुर्णतः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना नागरीकांचे हाडे खिळखिळी होत आहे तर वाहनांचा देखील खुळखुळा होत आहे. त्यामुळे नागरिक रुग्णालयात तर वाहने गॅरेजमध्ये गर्दी करत आहेत.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर संगमनेरच्या विकासाला काहिसा ब्रेक लागला. निधीअभावी अनेक विकासकामे रखडली. नगरपरिषदमध्ये प्रशासकराज, लोकसभा निवडणूक आचारसंहिता, महायुतीचा पराभव, विधानसभा निवडणुकीचे वेध, लाडकी बहिण योजना, आचारसंहिता अशा अनेक कारणांमुळे संगमनेर शहरातील विकासकामांना गती मिळाली नाही. दरम्यान सर्वाधिक दुर्दशा झाली ती शहर व उपनगरातील रस्त्यांची. आज अनेक रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. खड्डे आणि धुळ यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधी नसल्याने तक्रार करायची कुणाकडे, नगरपरिषद देखील या खड्ड्यावर केवळ माती टाकून मलमपट्टी करण्यापलीकडे काहीच करताना दिसत नाही. निधीचे कारण सांगून डांबरीकरण थांबलेले आहे. तर लाडक्या बहिणींचे लाड करण्यात येत असल्यामुळे विकास कामांना सरकारला रस्त्यांसाठी पुरेसा निधी देता येत नाही. अशा विचित्र परिस्थिती सर्वसामान्य नागरीक भरडले जात आहे.

संगमनेर शहराचा झपाट्याने विस्तार होत असतांना मुलभूत सुविधा मात्र कमी होतांना दिसत आहे. अरूंद रस्ते, वाढती रहदारी, प्रचंड अतिक्रमण यामुळे वाहतूकीची मोठी समस्या शहरात निर्माण झाली आहे. यातच आता रस्त्यांच्या दुर्देशेमुळे या समस्येत आणखी भर पडली आहे. प्रचंड रहदारीचा असणारा अकोले नाका ते 132 केव्ही हा महामार्गाला जोडणारा रस्ता पुर्णत; खड्ड्यात गेला आहे. शहरातील गल्ली बोळातील रस्त्यांची तर मोठी दुर्दशा आहे. महत्त्वाच्या बाजारपेठेत देखील रस्ते सरळ राहिले नाही. नाव घेण्यासारखा आज शहरात एकही रस्ता शिल्लक नाही. राजकारणी राजकारणात व्यस्त आहे. कार्यकर्ते त्यांची तळी उचलण्यात व्यस्त आहे. निवडणूकाही विकासाच्या मुद्द्यावरून भरकटून धर्म आणि द्वेषाच्या राजकारणावर गेली. त्यामुळे विकास आणि नागरीकांच्या समस्या बाजूलाच राहिल्या. आता राज्यात जुनेच परंतू नवा गडी सत्तेवर आला आहे. तालुक्यालाही नवीन नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे या प्रश्‍नाकडे नवीन आमदार अमोल खताळ गांभीर्याने लक्ष देणार का? असा प्रश्‍न नागरीक विचारत आहे. खड्डेमय रस्त्यातून नागरीकांची सुटका व्हावी अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख