दोन वर्षे रखडलेल्या म्हाळुंगी पुलावरून रंगला श्रेयवादाचा कलगीतुरा

म्हाळुंगी पुलाचे श्रेय ना. विखेंचेच – ॲड. गणपुले

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
– म्हाळुंगी नदीवरील जुन्या पूलाचा निधी त्यावेळी उपलब्ध होण्यात देखील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांचे योगदान होते आणि आता देखील मिळालेल्या निधीसाठी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाच पाठपुरावा आहे. त्यामुळे श्रेय द्यायचेच असेल तर खा. बाळासाहेब विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देऊन या पुलाला त्यांचे नाव दिले पाहिजे अशी मागणी संगमनेर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ उपस्थित होते. अ‍ॅड. गणपुले म्हणाले म्हाळुंगी नदीच्या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणारे मंत्री विखेच आहेत. लोकांची दिशाभूल करून आंदोलनाला बसवले. तांत्रिक मंजुर्‍यांना वेळ जातोच. पूर्वी 2016 मध्ये नाटकी नाला सुशोभिकरणासाठी 7 कोटी निधी आला होता. परंतु हा निधी वापरला गेला नाही. तो निधी व्यापारी संकुलाचा दुसरा आणि तिसरा मजला करण्यासाठी वळविला गेला. त्यामुळे सुशोभीकरणाचा घाट ठेकेदार पोसण्यासाठी घातला जातोय का? असा प्रश्‍न निर्माण होतो. पुलाच्या तिथे क्रॉसमध्ये करायचे नाही असे असताना भुयारी गटाराचे काम केले गेले. भुयारी गटारीचे पाईप टाकताना पुलाचा राफ्टच बेस कट झाला
त्यामुळे म्हाळुंगीला आलेल्या पुरात पुलाचा पायाच खचला. म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सतत पाठपुरावा केला. साडे सात कोटी निधी पडलेल्या पुलाच्या कामासाठी वळवावा यासाठी पाठपुरावा केला. पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिले. आणि त्याप्रमाणे मंत्री यांनी तो निधी पुलासाठी निधी वर्ग केला. निधी उपलब्ध करून देणारे विखेच आहेत. मात्र मी केले म्हणून असे स्टेस्टमेंट कोणी करत असेल तर त्यांनी कागद दाखवावा. आम्ही पुराव्यानिशी कागदपत्रांसहित बोलत आहोत. मंत्री विखेंनी अधिकार्‍यांना सूचना दिल्यात तेव्हा निधी मंजूर झाला. असा टोला ही गणपुले यांनी नाव न घेता आ. थोरात यांना लगावला. त्यामुळे श्रेय द्यायचेच झाल्यास खासदार किंवा मंत्री विखे पाटीलांचे नाव पुलाला द्यावे अशी मागणी अ‍ॅड. गणफुले यांनी केली

आ. थोरातांमुळे म्हाळुंगी पुल – पापडेजा

Balasaheb thorat

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे राज्यासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. शहरातील घोडेकर मळा, साईबाबा मंदिर, पंपिंग स्टेशन, गंगामाई घाट परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आ. बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्याच प्रयत्नातून या पुलाचे काम सुरू होत आहे. मात्र ज्यांनी श्रेयासाठी पूलाचा निधी अडवण्याचा प्रयत्न केला ती भाजपाची मंडळी आता खोट्या बातम्या देऊन श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत असल्याची टीका शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे.
प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात पापडेजा यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरातील प्रत्येक विकास कामासाठी आ. बाळासाहेब थोरात यांनीच पाठपुरावा केला. त्यामुळे संगमनेर शहरात हायटेक बस स्थानकासह वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन द्वारे 24 तास मिळणारे पाणी, नुकताच झालेला हॅपी हायवे यासह अनेक मोठमोठी विकास कामे राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहेत. 2022 मध्ये आलेल्या पुरामुळे म्हळुंगी नदीवरील पूल खाचला होता. त्यामुळे घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, ओहरा शाळा व महाविद्यालय, गंगामाई घाट परिसरातील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी गैरसोय झाली होती.

यामुळे या पुलाचे काम तात्काळ व्हावे याकरता आ. बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना 30 नोव्हेंबर 2022 रोजी पत्र देऊन या कामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी केली होती.
आ. थोरात हे विधान मंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. याचबरोबर राज्यातील विविध खात्यांचे मंत्रिपद त्यांनी अत्यंत सक्षमरित्या सांभाळले असून सध्या काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. सर्व पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या कामाला साडेचार कोटींचा निधी दिला. मात्र हा निधी मिळू नये या कामी स्थानिक भाजपाने सत्ताधार्‍यांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे. आता पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने हीच मंडळी श्रेयासाठी सरसावली आहे. त्यांनी एक तरी चांगले काम केले का ? याचे उदाहरण जनतेला दाखवले पाहिजे फक्त पत्रक बाजी करण्यात पुढे असलेल्या पुढार्‍यांचेे किंवा त्यांच्या पक्षाचे विकास कामांमध्ये योगदान काय? असा सवाल करताना आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच हे काम होणार असल्याचे सर्व नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या खोट्या बातम्यांना जनता कधी बळी पडणार नाही असेही निखिल पापडेजा यांनी म्हटले आहे.

शहरातील म्हाळुंगी नदीवरील पूल पडून दोन वर्षे होत आले आहे. तो प्रत्यक्षात उभा राहण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे नक्की सांगता येणार नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून संगमनेरात श्रेयवादाचे राजकारण चांगलेच तापत आहे. भाजपने पत्रकार परिषदेत घेऊन या पुलाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. मुळात दोन वर्षे येथील नागरिक त्रास सहन करीत असताना हे राजकीय पक्ष काय करीत होते हा खरा प्रश्न आहे. येथील नागरीकांनी याबाबत सातत्याने आवाज उठविल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर या पुलाच्या कामाला सुरुवात होत आहे. मात्र कामाला उशीर झाला याबद्दलची जबाबदारी न घेता श्रेयवादाचे राजकारण करणाऱ्या या पक्षांपैकी कोण खरा आणि कोण खोटा हे सामान्य नागरिकांना चांगले माहित आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख