ठाकरे परिवाराची प्रतिमा मलिन करणार्‍यांवर कारवाई करा – निवेदन

0
1539

पुन्हा घडल्यास गुन्हा दाखल करू – पोलिस निरीक्षक भगवान मथुरे

समाज माध्यमांवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा याबाबतचे निवेदन उपविभागायी पोलीस अधिकारी सोमानथ वाकचौरे यांना देतांना अमर कतारी, अमित चव्हाण, दिपक साळुंखे, राजू सातपुते, अमोल डुकरे, अजित मोमीन दिसत आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राजकीय नेत्यांविरुद्ध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून संगमनेरमध्ये सध्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वादंग निर्माण होऊ लागले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अमर कतारी यांनी मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देऊन सौ शहरी एक संगमनेर या ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या ग्रुप विरुद्ध पोलिसांनी कारवाई देखील केली. ओन्ली फॉर अ‍ॅडमिन व्यतिरिक्त कोणालाही या ग्रुपवर पोस्ट टाकता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
यासंदर्भात शिवसेनेचे अमर कतारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर सौ शहरी एक संगमनेरी असा ग्रूप आहे. या ग्रुपचे अ‍ॅडमिनने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. आदित्य ठाकरे व ठाकरे परिवाराची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून जाणीवपूर्वक हे फोटो व चुकीच्या पोस्ट स्वतःच्या मोबाईल नंबरवरून शेअर केले. यामुळे सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. शिवसेना पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने यापूर्वीही शहर पोलिसात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. तरीदेखील ते परत परत चुका करत आहेत. पोलिसांनी यापूर्वी त्यांना नोटीस दिली. ग्रुपचे अ‍ॅडमिन यांच्यावर सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. सदर इसमाला या संदर्भात यापूर्वी सक्त सूचना दिली. असा प्रकार पुन्हा घडल्यास गुन्हा दाखल करू, असे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले. याबाबत सदर ग्रुप अ‍ॅडमिनला विचारले असता त्यांनी सांगितले, अमर कतारी व माझ्यामध्ये बोलणे झाल्यानंतर मी पोस्ट व फोटो डिलीट केले. दरम्यान शहरातील अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर राजकीय नेत्यांची बदनामी त्याचबरोबर धार्मिक भावना दुखावणार्‍या पोस्ट व्हायरल केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here