वीज कनेक्शन कट करू नये, कांद्याला भाव वाढ मिळावी या मागण्या
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र सरकार हे उद्योजकांना पाठीशी घालत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. सध्या सर्रासपणे वीज कनेक्शन तोडले जात असून हे वीज कनेक्शन तोडू नये. कांद्याला भाव वाढ मिळावी. महागाई कमी करावी यांचा विविध मागण्यासाठी शुक्रवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 9 वा. संगमनेर बस स्थानक येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे व शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कानवडे म्हणाले की, देशात व राज्यात भाजपा सरकार आहे. हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी आहे. मोठ्या उद्योजकांना कोट्यावधी रुपयांची माफी दिली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची माफी दिली जात नाही. सध्या उन्हाळ्यामुळे मोठ्या कष्टातून उभे केलेल्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र हे जुलमी सरकार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करत आहे. एका बाजूला शेतमालाला भाव नाही. कांद्याचे भाव कोसळले अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडला असून अशा काळात वीज कनेक्शन कट करणे अत्यंत चुकीचे आहे.
म्हणून कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट करू नये, कांद्याला किमान 2000 रुपये हमीभाव द्यावा. विविध शेतमालांची हमीभाव जाहीर करावे, महागाई कमी करावी अशी विविध मागण्यांसाठी संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी सकाळी 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून हे आंदोलन सुरू होणार असून संगमनेर बस स्थानकासमोरील चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेस सह सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व मित्रपक्ष सहभागी होणार आहेत.तरी या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावी असे आवाहन संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.