
राजकीय कुरघोडीमुळे अनधिकृत फ्लेक्सबाजीचा हैदोस
बसस्थानक परिसर वाहतुकीच्या संकटात
संगमनेर बसस्थानक परिसर आधीच बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणामुळे गोंधळलेला आहे. त्यात आता फ्लेक्स आणि कमानींच्या अतिक्रमणामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. बसगाड्यांना बसस्थानकात वळण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. अवजड वाहने या कमानींमुळे अडकत आहेत. प्रवाशांना चालण्यास जागा राहत नाही. काही दिवसांपूर्वी उभारलेली एक भव्य कमान कोसळली होती. सुदैवाने तेव्हा जीवितहानी झाली नाही, मात्र प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. भविष्यात अशा घटनांमध्ये नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
युवावार्ता (संजय आहिरे)
संगमनेर – शहरात सध्या राजकीय कुरघोडी, वर्चस्व आणि नेत्यांचा उदोउदो, उद्घाटन वाढदिवस, अभिनंदन जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी होत आहे. परिणामी, शहर विद्रूप होण्यासोबतच नागरीकांना वाहतूक कोंडी, सुरक्षिततेचा अभाव आणि वाढत्या अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांवर अनधिकृत फ्लेक्स तसेच मोठमोठ्या कमानी उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
फ्लेक्सबाजीचा वाढता हैदोस सण, उत्सव, वाढदिवस, सत्कार समारंभ किंवा कोणत्याही राजकीय घडामोडींसाठी मोठमोठे फ्लेक्स लावण्याची स्पर्धा संगमनेरमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे, या फ्लेक्ससाठी अनेक वेळा कोणतीही परवानगी घेतली जात नाही. यामुळे शहरातील सौंदर्य हरवले असून, मुख्य चौक, बसस्थानक, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी या जाहिरातींचे अतिक्रमण वाढले आहे.
फ्लेक्सबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट नियम असतानाही शहरात विनापरवानगी फ्लेक्स आणि कमानी उभारल्या जात आहेत. नगरपालिका किंवा संबंधित यंत्रणांनी वेळोवेळी कारवाई करण्याची गरज आहे. जर प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले नाही, तर भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी
शहरात विना परवानगी मोठमोठ्या कमानी, फ्लेक्स लावले जात आहे. पालिकेचे काही कर्मचारी संबंधितांशी साटेलोटे करून त्यांना मोकळे रान करून देतात. घेतलेल्या मुदतीपेक्षा अधिक काळ हे फ्लेक्स शहरभर लटकत राहतात. मात्र त्यामुळे शहराचे विदृपीकरण होत असून नागरीकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार कर्मचार्यांवर कारवाई करावी.
संगमनेरकर आता या बेशिस्त फ्लेक्सबाजीला कंटाळले आहेत. अनेक नागरिक सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांमध्ये या समस्येवर आवाज उठवत आहेत. अनधिकृत फ्लेक्स आणि कमानी त्वरित हटवाव्यात. परवानगीशिवाय फ्लेक्स लावणार्यांवर कारवाई करावी. शहरातील मुख्य चौक आणि सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी फ्लेक्सबंदी लागू करावी. राजकीय कुरघोडीसाठी होणारी ही स्पर्धा थांबवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. फक्त प्रचारासाठी नव्हे, तर शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक बदल घडवावा. संगमनेर हे ऐतिहासिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासन, स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा, या अनागोंदीमुळे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. संगमनेरात राजकीय परिवर्तन झाल्यानंतर ही समस्या अधिक गडद झाली आहे. एक गट, पक्ष दुसर्यावर हावी होण्यासाठी एकापेक्षा एक मोठमोठे फ्लेक्स लावण्याची स्पर्धा जणू याठिकाणी सुरू झाली आहे. त्यातून वाहतूक समस्या तर निर्माण झाली शिवाय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. फ्लेक्स लावण्याची जागा आणि आकार यावर आता नेहमीच वाद होऊ लागले आहे. महामार्गावरच या कमानी व फ्लेक्स लावले जात असल्याने अपघात घडल्यास त्यास कुणाला जबाबदार धरणार असा प्रश्न विचारला जात आहे. प्रसिद्धीची हौस असणारे हे पुढारी ही जबाबदारी घेणार का?