९७ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा लक्षात घेता प्रशासनाने विकासकामांना मोठी चालना दिली असून, संगमनेर तालुक्यासाठी ही मोठी संधी ठरणार आहे. दि. 30 जानेवारी 2026 रोजी झालेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत संगमनेरमार्गे शिर्डीला जोडणार्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना तब्बल 97.25 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

ही बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत येणार्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. संगमनेरला जोडणार्या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश या मंजुरीमध्ये संगमनेर तालुक्यातील निळवंडे-कौठे कमळेश्वर, वडगावपान, निळवंडे आणि संगमनेर-वडगावपान या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. हे रस्ते सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, पुणे-शिर्डी मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे पर्यायी मार्ग म्हणून त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेरचे कार्यकारी अभियंता यांनी सादरीकरणाद्वारे या रस्त्यांची बिकट स्थिती आणि दुरुस्तीची तातडीची गरज अधोरेखित केली. यानंतर प्राधिकरणाने सर्वानुमते निधीला मंजुरी दिली. कुंभमेळा काळात नाशिक आणि शिर्डी येथे भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. याचा थेट फायदा संगमनेरला होणार असून, रस्ते सुधारल्यामुळे वाहतूक सुलभ होणार, व्यापार वाढणार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

स्थानिकांसाठी दिलासा- दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्यांच्या कामांना अखेर मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कामांमुळे केवळ कुंभमेळ्याच नव्हे, तर भविष्यातील दळणवळण व्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने घेतलेला हा निर्णय संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, धार्मिक पर्यटनासोबतच पायाभूत सुविधांमध्येही मोठी सुधारणा घडवून आणणार आहे.




















