२२ फेब्रुवारीला ‘हॅपी स्ट्रीट’ची मेजवानी – उपक्रमाचे १० वे वर्ष

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील नागरिकांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा आणि सर्वांनी एकत्र येत आनंदाचे क्षण अनुभवावेत, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ संगमनेरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘आनंदी रस्ते’ अर्थात ‘हॅपी स्ट्रीट’ या लोकप्रिय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा या उपक्रमाचे 10 वे वर्ष असून, हा उपक्रम रविवार, दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत स्व. ओंकारनाथ मालपाणी मार्गावर राजपाल क्लॉथ स्टोअर ते जाणता राजा मैदान या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमामध्ये नागरिकांना विविध खेळ, गाणी, गप्पा, गोष्टी आणि झुंबा डान्सच्या माध्यमातून आनंदाची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. आकर्षक चित्रांनी सजविलेला रस्ता, रंगकाम केलेली झाडे, फुगे आणि विविध सजावटींमुळे परिसरात उत्साही आणि आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे. तसेच ऑर्केस्ट्रा, वासुदेव, नृत्य, लेझीम, मल्लखांब, व्यंगचित्रे, आकर्षक निवेदन आणि बहारदार झुंबा डान्स यांसारख्या विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा नागरिकांना आनंद घेता येणार आहे.

या उपक्रमात सहभागी होणार्या विद्यार्थी आणि नागरिकांनी लिंगोरचा, दोरी-उड्या, क्रिकेट, व्हॉलीबॉल, गोट्या, टायर-चकरी, फ्लाइंग डिश, बोलक्या बाहुल्या यांसारखे विविध खेळांचे साहित्य तसेच मिमिक्री, जोक्स, वात्रटिका, विडंबन गीते आणि इतर गुणदर्शन सादर करण्यासाठी साहित्य आणल्यास त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘आनंदी रस्ते’ हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून नागरिकांमध्ये सामाजिक एकोपा वाढविणे, कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालविण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि पारंपरिक खेळ व कला जपण्यास प्रोत्साहन देणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. या माध्यमातून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते, तसेच नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होते. अशा उपक्रमांमुळे शहरात आनंदी आणि निरोगी वातावरण निर्माण होण्यास हातभार लागत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

या आनंददायी उपक्रमात जास्तीत जास्त संगमनेरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे अध्यक्ष रोटेरियन विश्वनाथ मालाणी, सेक्रेटरी सौरभ म्हाळस आणि सर्व रोटरी सदस्यांनी केले आहे. नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून ‘आनंदी रस्ते’ या उपक्रमाचा मनमुराद आनंद घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आनंदी रस्ते उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून रोटेरियन संकेत काजळे यांच्यासह धीरज देशमुख, महेश वाकचौरे आणि समीर शहा कार्यरत आहेत.
या उपक्रमाच्या प्रकल्प समितीमध्ये दिलीप मालपाणी, दीपक मणियार, अजित काकडे, ओंकार सोमाणी, नरेंद्र चांडक, ऋषिकेश मोंढे, आनंद हासे, अमित पवार, मधुसूदन करवा, सोनू राजपाल, किशोर पोखरकर, राजेंद्र खोसे, विकास लावरे, डॉ. मनोहर सचदेव, डॉ. विनायक नागरे आणि संदीप फटांगरे आदींचा समावेश आहे.






















