तिघांवर गुन्हा दाखल, तीन हजार रूपये हस्तगत
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- मोठ्या कालखंडानंतर व शहरभर बोकाळलेल्या मटका या जुगार अड्ड्यांवर काल शहर पोलीसांनी छापेमारी करत कारवाई केली. शहरातील तीन ठिकाणी केलेल्या या कारवाईत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन हजार दोनशे वीस रूपये जप्त करण्यात आले.
संगमनेर शहरात गुटखा, मटका, कत्तलखाने, चोर्या, घरफोड्या, हाणामारी, अत्याचार, अवैध लॉज, कॅफे, संस्कृती, हुक्का पार्लर, क्लब, जुगार असे अनेक अवैध धंदे जोमाने सुरू असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. या बाबत अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होतात. मात्र त्याचे पुढे काहीही होत नाही. गुन्ह्याचा तपास लागत नाही. किंवा आरोपींना दहशत बसेल अशी कारवाई होत नसल्याने गन्ह्यांचा आलेख सातत्याने वाढत आहे.
दरम्यान काल सर्वत्र दसरा सणाचा उत्सव साजरा होत असतांना शहर पोलीसांनी नाशिक रोडवरील हॉटेल लकीच्या मागे एका टपरीत चाललेल्या कल्याण मटका या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलीसांनी तेथून 1 हजार 50 रूपये रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. तर यावेळी गणेश निवृत्ती पाठक रा. देवाचा मळा हा इसम सदर अड्डा चालवित असल्याचे समोर आल्याने त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सायंकाळी सात वाजता करण्यात आली.
त्यानंतर सायंकाळी सात वाजता पोलीस पथकाने आणखी दोन ठिकाणी छापे मारले. यात एका ठिकाणी कारवाई करत एक हजार 150 रूपये रोख रक्कम व कल्याण मटका जुगाराचे साहित्य जप्त केले व आरीफ राजमहंमद सय्यद रा. मदिना नगर संगमनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसर्या कारवाईत 1 हजार वीस रूपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करत मच्छिंद्र लक्ष्मण काकडे (रा. साळीवाडा) याच्यावर मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ऐन सणासुदीच्या काळात उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली जुगार मटका अड्ड्यांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे मटका चालविणारे व खेळणार्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर या कारवाईचे नागरीकांकडून स्वागत होत आहे.