वाघापूरमध्ये वडाच्या झाडाची अवैध कत्तल

0
1627
वडाच्या झाडाची अवैध कत्तल

हजारो पक्षी बेघर, कारभारीच झाले वैरी – वनविभागाचे दुर्लक्ष

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे – तालुक्यातील आदर्श गाव म्हणून परिचित असणार्‍या वाघापूर मध्ये गाव कारभार्‍यांनीच नदीकाठच्या गावठाण जागेवरील सुमारे पंधरा वर्षे जुने वडाच्या झाडाची कत्तल केली. या अवैध कत्तलीमुळे या झाडावरील हजारो पक्षी बेघर झाले आहे. काही गाव कारभार्‍यांनी केलेल्या या अवैध उद्योगामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. वड, पिंपळाचे वृक्ष तोडणे कायद्याने गुन्हा असून अशा गंभीर प्रकरणाची वनविभागाने गंभीरपणे दखल न घेतल्याने या संतापात भर पडली आहे.


याबाबत माहिती अशी की, वाघापूर गावात प्रवरा नदीकाठी बारा पंधरा वर्षांपूर्वीचे एक वीस ते पंचवीस फुट लांबीचे व अनेक फुट विस्तारलेले झाड होते. या झाडावर हजारो बगळे, कावळे यांची वस्ती होती. येथूनच जवळ दशक्रियाविधी स्थळ आहे. गावच्या बाहेर गावठाण हद्दीत असलेल्या या झाडापासून कुणालाही त्रास नव्हता. परंतु दोन दिवसांपूर्वी काही गावकारभार्‍यांच्या मनात आले आणि त्यांनी ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता, वनविभागाची परवानगी न घेता सरळ या झाडाची कत्तल सुरू केली.

झाडावरील पक्षी घाण करतात, झाडाला पार बांधायचा असे सांगत सुरवातीला फक्त झाडाच्या फांद्या डहाळणार असे वाटत असतानाच या पुढार्‍यांनी जवळपास 90 टक्के हे झाड तोडून टाकले. ज्यांच्या खांद्यावर कायदा पाळण्याची जबाबदारी होती, नियम कायदे माहिती असताना केवळ वैयक्तिक फायद्यासाठी दबंगगिरी करत त्यांनी या वडाच्या झाडाची कत्तल करत हजारो पक्षांचा संसार उद्धवस्त केला.वाघापूर गावची लोकसंख्या 1500 आहे. तर या झाडावर राहणार्‍या पक्षांची संख्या साधारण 2 ते 3 हजार होती. याचा विचार करणे गरजेचे होते.


दरम्यान वडाचे झाड हे हेरिटेज व्याख्येत येत असल्याने ते तोडता येत नाही. जर त्या झाडाचा अडथळा होत असेल तर त्याचे पुनररोपण करता येते. हे झाड तोडतांना काही पक्षांची घरटी नष्ट झाली आहेत. यात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु वनविभागाला याबाबत माहिती देऊनही त्यांनी थातूरमातूर कारवाई करत ग्रामस्थांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यामागे कुणाची शक्ती आहे का असा आरोपही केला जात आहे. वड आणि पिंपळ या झाडांचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. तसेच हे झाड ऑक्सिजन देणारे असल्याने त्याचे संगोपन सोडून वाघापूरमध्ये थेट या झाडाची कत्तल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here