प्रदूषणामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर येथील नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोला गुरूवारी सायंकाळी मोठी आग लागली. या आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. या आगीमुळे संपूर्ण परिसर काळवंडून गेला होता, आगीच्या झळांमुळे वाहतुकीला काही वेळ अडथळा निर्माण झाला होता.
संगमनेर खुर्द येथे नगरपालिकेचा कंपोस्ट डेपो आहे. शहरातील सर्व कचरा या कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून या डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला होता. या कचरा डेपोला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले. त्यानंतर सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले गेले.
आग लागल्याचे वृत्त समजताच संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने दखल घेत दोन अग्निशामक पाठवल्या. दोन अग्निशामकच्या सहाय्याने रात्री उशिरा ही आग विझविण्यात आली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. उन्हाळ्यात विविध कारणांमुळे कचरा आपोआप पेट घेत असतो. वार्यांमुळे ही आग लगेच भडकत असते. त्यामुळे नेहमी सतर्क राहावे लागते. दरम्यान, आग विझल्यानंतर परिसरामध्ये धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. या परिसरात नागरी वस्ती मोठी आहे. हा कंपोस्ट डेपो इतर ठिकाणी हलवावा, अशी मागणी संगमनेर खुर्द परिसरातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. संगमनेरातील कंपोस्ट डेपोला दरवर्षी आग लागते. कंपोस्ट डेपोला आग लागते की, लावली जाते, असा सवाल परिसरातील रहिवासी विचारत आहे.
या कंपोस्ट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक टाकण्यात येते, त्यामुळे आग लागल्यानंतर विषारी धूर तयार होतो. यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित झाले असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या कंपोस्ट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो. कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने जाणीवपूर्वक आग लावली जात असावी, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या कंपोस्ट डेपोमुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे. हा कंपोस्ट डेपो अन्य जागेत हलवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.