
दोघांचा जागीच मृत्यु
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे – संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर भरधाव आलेल्या कारने रस्त्यावरील डिव्हायडरला जोराची धडक दिली. मात्र या धडकेत रस्त्याची साफसफाई करणारे दोन कर्मचारी जागीच ठार झाले. ही भीषण अपघाताची घटना काल मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास मालपाणी कंपनी जवळ घडली. सिफ्ट कार क्रमांक एमएच 14 जे एच 0834 वरील चालक शशिकांत संजय घोडेकर (रा. पंचवटी नाशिक) हा नाशिकवरून भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने जात असतांना मालपाणी कंपनी जवळ त्याचा आपल्या कारवरील ताबा सुटला. या कारने रस्त्यावर डिव्हायडरला लावलेल बॅरिकेट उडवून दिले. मात्र याचवेळी टोल नाक्याचे कर्मचारी साप सफाई व डागुजी करत होते.

हे बॅरिकेट कारने उडविल्याने त्यात या कर्मचार्यांना गंभीर दुखापत झाली. यात गिरीजा मुनसितुरीया (वय 52, रा. गहलोर, बडकी, बिहार), सुरेश चेतु खैरवार (वय 55, रा. गहलोर, बिहार यांना गंभीर मार लागल्याने उपचारासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी अमोल सुभाष बनसोडे (रा. चंदनापुरी, मुळ रा. लातुर) यांच्या फिर्यादीवरून कार चालक शशिकांत संजय घोडेकर याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 55/2022 भादंवि कलम 304 (अ), 279, 338, मोटारसायकल कायदा 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महाले करत आहे.
भरधाव आलेल्या या कारने बॅरिकेट उडविल्याने हा भीषण अपघात घडला. यात कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांना घटना समजताच त्यांनी घटनास्थळी येत कारचालकाला ताब्यात घेतले व वाहतूक सुरळीत केली.