निवडणूकीची रणधुमाळी आणि महिलांची पाण्यासाठी वणवण

0
1386

नेत्यांकडून आश्वासनांची खैरात

नागरीकांना हवी दुष्काळात रोजगार आणि पाण्याची हमी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सध्या ग्रामीण भागात गावोगाव यात्रा, जत्राचा हंगाम जोरात सुरू आहे. ग्रामदैवत, देवी देवतांच्या जत्रा-यात्रेच्या परंपरेनुसार धार्मिक विधी सोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे, लोकनाट्याचे देखील आयोजन केलेले असते. सोबत यावर्षी लोकसभेच्या निवडणुकाही असल्यामुळे नेते, पुढारी आणि खासकरून कार्यकर्ते हे यात्रा- जत्रांना भेट देऊन प्रचार यंत्रणा राबवित आहेत. या सर्व धामधुमीत अनेक गावांत आज तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न आ वासून उभा आहे. तर आदिवासी भागातील अनेक गावे आजही लोकप्रतिनिधीनी दिलेल्या फसव्या आश्वासनाला उराशी बाळगून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत.


बहुतांश गावांमधून पशु, पक्षी, जनावरे तहानलेली असून गावकर्यांना देखील पिण्याचे व रोजच्या वापरासाठी लागणारे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. आदिवासी पट्ट्यातील महिला एक हंडा पाण्यासाठी वणवण भटकू लागले आहे. ग्रामीण भागात ओढे, नाले, नद्या, विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या ठाक पडल्याचे चित्र तालुक्यातील काही गावांत आणि खासकरून आदिवासी भागात दिसून येत आहे. तर धरण क्षेत्रांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. गावोगावच्या यात्रेतील तमाशात गाणी व निवडणुकीच्या प्रचारात फिरणार्या गाडीवर भोंग्यातून वाजत असलेली गाणी मनोरंजन करतात मात्र तहानलेल्या नागरीकांना दिलासा देत नाही. शेतमालाचे पडलेले बाजारभाव, पिकांचे कमी गळीत अन् बिबट्यांची दहशत शेतकर्याच्या पाचवीला पुजलेली दिसते. परिणामी मतदारांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेची निवडणूक देखील भीषण पाणी टंचाईवर गाजणार असून ज्या भागात नागरिक पाण्यासाठी टाहो फोडीत आहेत. त्या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार्या उमेदवाराच्या पाठीशी मतदार राजा उभा रहाणार हे अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पठार भागात, निमोण, तळेगाव भागातील गावे वाडी वस्तीला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यात्रेत आणि प्रचारात केवळ गाणी वाजवून पाणी मिळणार का?असा खडा सवाल शेतकरी करू लागले आहेत. अद्याप पाऊस सुरू व्हायला दोन महिने बाकी आहेत. पिण्याचे पाणी कोण व कसे देणार याचे उत्तर मतदार राजाला अपेक्षित आहे. निवडणूकीत नेत्यांकडून मतदारांना आश्वासनाची खैरात केली जात आहे. मात्र मतदार म्हणून शेतकरी हमी भाव, रोजगार आणि महिला पाणी मागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here